श्रावण
श्रावण श्रावण म्हणजे सळसळणारी हिरवी पाने ओली गं झोपाळ्यावर झुलता झुलता मने सयांची भिजती गं खरोखरच विहंगम असे श्रावणाचे चित्र! आताच्या धावपळीत केलेली एखादी वर्षासहल निसर्गाच्या बरेच जवळ घेऊन जाते. पण कुठे तरी अपुर्णता जाणवते. बालपणीचा श्रावण डोळ्यासमोर तरळत असतो. खेळता- खेळता,शाळेतून येतानाचे मुक्त भिजणे आठवते! हा सणांचा महिना! श्रावणी सोमवार, शुक्रवार यातून श्रावणाची जाणीव व्हायची. श्रावणी सोमवारची अर्धी सुट्टी, बेलाचे ढीग, पांढरी फुले, मंदिराजवळची गाणी, सगळे शिवमय होऊन जायचे. श्रावणी शुक्रवारसाठी आघाडा, केणा,दुर्वा, फुले गोळा करताना बारकाईने हिरवी सृष्टी बघायला मिळायची. जिवतीची पूजा, पुरणाचा नैवेद्य, लक्ष्मीच्या आरत्या हे सगळे मंगलमय वाटायचे. जेष्ठादेवीच्या आरतीचे पुरणाचे दिवे असायचे. तूप टाकलेल्या या दिव्यांनी मुलांना ओवाळले जायचे, नंतर करपलेला भाग काढून ते दिवे खाणे ही गम्मतच असायची. या दिवशी श्रद्धेने कथा वाचल्या जायच्या. नागपंचमीही अशीच छान नटलेली. नागाची पूजा, त्यासाठी वारुळाला म्हणजे नागोबाच्या ...