श्रावण

 श्रावण


श्रावण म्हणजे सळसळणारी हिरवी पाने ओली गं

झोपाळ्यावर झुलता झुलता मने सयांची  भिजती गं


खरोखरच विहंगम असे श्रावणाचे चित्र! आताच्या धावपळीत

केलेली एखादी वर्षासहल निसर्गाच्या बरेच जवळ घेऊन जाते. 

पण कुठे तरी अपुर्णता  जाणवते. बालपणीचा श्रावण डोळ्यासमोर तरळत असतो. खेळता- खेळता,शाळेतून येतानाचे मुक्त भिजणे आठवते! 

हा सणांचा महिना! श्रावणी सोमवार, शुक्रवार यातून श्रावणाची जाणीव व्हायची.  

श्रावणी सोमवारची अर्धी सुट्टी, बेलाचे ढीग, पांढरी फुले, मंदिराजवळची गाणी, सगळे शिवमय होऊन जायचे. 

श्रावणी शुक्रवारसाठी आघाडा, केणा,दुर्वा, फुले गोळा करताना बारकाईने हिरवी सृष्टी बघायला मिळायची. जिवतीची पूजा, पुरणाचा नैवेद्य, लक्ष्मीच्या आरत्या हे सगळे मंगलमय वाटायचे. जेष्ठादेवीच्या आरतीचे पुरणाचे दिवे असायचे. तूप टाकलेल्या या दिव्यांनी मुलांना ओवाळले जायचे, नंतर करपलेला भाग काढून ते दिवे खाणे ही गम्मतच असायची. या दिवशी श्रद्धेने  कथा वाचल्या जायच्या. 

     नागपंचमीही अशीच छान नटलेली. नागाची पूजा, त्यासाठी 

वारुळाला म्हणजे नागोबाच्या मंदिरात जाणे ही एक

खास आठवण!जत्राच असायची! त्याआधी नागपंचमीसाठी बाजार फुलायचा. बायका बांगड्या भरत असत. अगदी गर्दी असायची.  मुलींसाठीही बांगड्या, नेलपेंट, रिबिनी,नवे कपडे याची गंमत असायची. मेंदी लावली जायची. मेंदीकोनचे काही प्रस्थ नव्हते, मग ती मेंदी कालवणे, त्याचा सुगंध भोवतालचा पाऊस यांचे जणू काही मिश्रण बनायचे. हे मेंदी, टिकली, बांगड्या घालून शाळेतही मिरवता यायचे. खाण्याचे वेगळे पदार्थही मिळायचे, ज्वारीच्या लाह्यांचे, फोडणी च्या लाह्या, दही मेतकूट घातलेल्या लाह्या असे पदार्थ खायला मिळायचे. 

जेवणात पंचमीदिवशी उकडीचे पदार्थ असायचे. मुटके भात, पुरणाचे दिंड,ओल्या शेवयांची खीर असे सर्व काही. या ऋतूमानात पचणारे ,हलके असे काहिसे! वडिलांचे,भावांचे डोळे धुवून औक्षण केले जायचे. नागपंचमीच्या कथा या शेतीजीवनाशी निगडित होत्या. सासुरवाशीणीला वाचवायला येणारा भाऊ, नाग हा भावाच्या रूपात आलेला अशा काही कथा असायच्या. 

श्रीकृष्णजन्माष्टमी हा पण उत्साहाचा सण. सभोवतालचे वातावरण पाहून श्रीकृष्ण जन्म वेळेची रात्र, पाऊस यांची सांगड आपसूक पडली आहे, असे कथा ऐकताना वाटायचे. चिखलाचे गोकुळ संध्याकाळीच पाटावर घरी तयार केले जायचे. डोळ्याच्या ठिकाणी ज्वारी, चिखलाच्या वृंदावनात मंजिरी खोचणे. गोकुळातील सर्व पात्रे, पाळणा, रांगणारे बळीराम, श्रीकृष्ण,वधस्तंभ, सातवी मुलगी, भटजी, पहाट झाली हे ओरडून सांगणारे कावळे, सगळे काही जन्माची पूर्ण माहिती द्यायचे. जन्माचा अध्याय, श्रीकृष्णाच्या आरत्या हे साक्षात दृश्य उभे करायचे .यावेळचा प्रसाद,सुंठवड्याची चव अजूनही आठवते. 

   राखी पौर्णिमा, नवे कपडे, भावंडांची भेट, ओवाळणी, खाऊ ही पण श्रावणातील एक मजा! एकूणच उत्सवाचे हे दिवस! ऊन पावसाच्या खेळाचे दिवस! 


तनाने भिजावे मनाने भिजावे

अशा श्रावणी खास पाऊस धारा

असा मास आला जगी उत्सवाचा

क्षणी ऊन येई क्षणी चिंब धारा


     पोळ्याला अतकूची वाणे बनवली जायची. आई देवाकडे तोंड करून पाठीमागे ही वाणे मुलांना द्यायची. अतीत कोण हा प्रश्न विचारला जायचा,आपले, आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांचे नाव सांगायचे

असे करत शेवटी 'श्रीकृष्ण' असे उत्तर द्यायचे. दोन छोट्या पूरणपोळ्या, पूरणाचे तूप टाकून पेटवलेले दिवे, मुटके असे ते वाण ज्या त्या मुलाने आपापले खाऊन संपवायचे. बाहेर बैल सजवणे, , त्यांची पूजा,मिरवणूक हे चालू असायचे. 

यावेळेपर्यंत मूग, उडीद यांच्या ओल्या शेंगा काढणीला यायच्या.  भाजलेल्या शेंगा, सोललेले दाणे मीठ टाकून परतून खायला मिळायचे.

या साऱ्या आठवणी प्रत्येक श्रावण ताजातवाना बनवतात. 

एकूणच हा श्रावण जेवढा निसर्गात तेवढाच घराघरात नटतो.सगळे वातावरण श्रावणासारखेच ताजेतवाने, हिरवेकंच, टवटवीत दिसू लागते. सृजनातला नवेपणा मनामनातही रुजतो.

वर्षेच्या थेंबामधली निर्मळता मनामनात पावित्र्य आणते सणांच्या रुपाने खुलते. 

म्हणूनच असे म्हणावेसे वाटते... 

धरित्रीतल्या गंध मोदात साऱ्या

मनुष्या अरे तूच बेभान व्हावे

ऋतू संगतीने जगी सुंदराने

कधी काव्य व्हावे कधी नृत्य व्हावे



सौ. अर्चना मुरूगकर

पुणे

archanamurugkar@gmail.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा