साहित्यातील राजकारण




 साहित्यातील राजकारण


साहित्य हे समाजाला दिशा देणारे आहे.साहित्यिकाचा आजही समाजात आदर केला जातो.तो त्याच्या एकमेवाद्वितीय प्रतिभेमुळे.थकलेल्या मनाला ते मार्गदर्शन करते .अनेक अभ्यासू व्यक्तींमुळे आपल्याला माहीत नसलेल्या क्षेत्रातील माहिती मिळते.अध्यात्मिक साहित्य हे मन: शांती प्रदान करते.लहानपणापासून एका निष्ठेने आपण या क्षेत्राकडे पहात असतो.

हे सगळे असूनही साहित्यात होत असणारे राजकारण नजरेस पडते.

पूर्वी कलाकारांना ,साहित्यिकांना राजाश्रय असायचा,निधीचा प्रश्न पडायचा नाही.आता स्वतंत्रपणे साहित्यसमूह मोठे करताना ते टिकवण्यासाठी न आवडणारी मदतही स्विकारावी लागते.ते आणून देणारे ,साहित्यात रस नसणारे पण लोक जपावे लागतात.निधीसोबत त्यांना हवे ते नाव,मत,प्रवाह,पक्ष ,पूर्वजांचे नाव मोठे होते.साहित्य दुय्यम ठरण्याचा धोका यात आहे.

शिवाय माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जो तो ज्ञान पसरवत आहे,यात माझे ते खरे, सगळ्यांना माझा विचार समजलेच पाहिजेत , ते बिंबवलेच पाहिजे या अट्टाहासातून स्वत:च्या तथाकथित विचारसरणीची माणसे एकत्र येतात गट-तट पडत जातात.राजकारण होते.

आपण स्वत: साहित्यिक म्हणून विकसित होताना काही कलावधी जावा लागतो एवढी उसंत साहित्यिकांजवळ राहिली नाही.आपले स्वभावदोष जवळून पाहून दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारे कुणी गुरू भेटतीलच असे नाही.यामुळे स्वसंयमाने राहणारे,शिस्त पाळणारे लोक नसतील तर वेगळा परिणाम दिसतो.त्यांना साम,दाम,दंड,भेद निती वापरून मोठे व्हावे वाटू शकते.यातूनही वैयक्तिक पातळीवर फायद्यासाठी राजकारणाला खतपाणी घालणारे निर्माण होऊ शकतात. मी तेवढा अनुभवी,मला मानणारा गट जिवंत ठेवायचाय यासाठी साहित्यातील ज्येष्ठ मंडळीही राजकारणाला खतपाणी घालतात.

मूळातच 'आता विश्वात्मके देवे ,येणे वाग्यज्ञे तोषावे' हे ऐकत मोठे झालेलो आपण ! सध्याच्या वातावरणात काय पहावे लागेल हे सांगता येत नाही.साहित्यक्षेत्रात स्वत: लेखक, कवी, साहित्यिक म्हणून वावरताना काही ज्वलंत आदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजचे आहे.साहित्यप्रकार मोठे करणे ,काळाप्रमाणे नवे प्रवाह जाणणे आवश्यक आहे.आज प्रत्येकाजवळ त्यांचे उद्दिष्ट असते.छोटेसे साहित्य मंडळ चालविणाऱ्यापासून ते मोठ्या राजकीय मंडळींच्या साहित्य शाखांपर्यंत!

आपला कुणी वापर करून घेत नाही ना हे तपासले पाहिजे.साहित्य हे अक्षर,अमर आहे.ते कुणाच्या लांगूलचालनासाठी क्षणिक मोहासाठी लिहिले जाऊ नये हे तत्व राखणे ही आपली जबाबदारी आहे.अपप्रचार पसरवणे,ऐतिहासिक बाबींमध्ये आजच्या प्रक्षेपाने बदल करणे हे यापैकीच आहे. कुठे नाही म्हणायचे,कुणाच्या मागे जायचे नाही,कुठे थांबायचे हे कळले पाहिजे.

जेवढा छोटा पैस ,तेवढी छोटी स्वप्ने ,स्वप्नपूर्तीच्या हट्टापायी वाट्टेल ते करणे हे दुष्टचक्र चालू होते.

साहित्यिकाने आपला दृष्टिकोन व्यापक ठेवणे आवश्यक आहे.

इतर साहित्य विचारप्रवाहात त्याला मिसळता यावे.त्याने इतकेही कट्टर असू नये की वाद चव्हाट्यावर यावेत आणि समाजाला हा साहित्यिक वेगळा ,हा माझा ,तो नाहीच नाही.असे म्हणत संकुचित विचारांत घेऊन जाऊ नये.षड्रिपूंनी त्रासलेल्यांना संतांनी भक्तीसाहित्यातून शांती,एकोपा मिळवून दिला.प्रसंगी कान उघाडणी केली. यासाठी आजही आपला वरचा हात राखणे गरजेचे आहे.आपले ज्ञान वाढवणे आवश्यक आहे.आगीत तेल ओतून संकुचित विचारांचा भडका उठवणे चुकीचे आहे.सामान्य माणूस त्रासलेला आहे ,तो अल्प वाचनाने ,आपल्या साहित्याने प्रक्षोभक बनू नये.ही काळजी घ्यावी.कारण आपल्याला जादूच्या छडीप्रमाणे परकायाप्रवेशाची क्षमता लाभली आहे. साहित्यिकाने राजकारणाचा स्वत:वर परिणाम होऊ देऊ नये.आपल्या आतला प्रतिभेचा निर्मळ झरा वाहता ठेवावा.मलीन होऊ देऊ नये.

काही प्रतिभावान मृदू स्वभावाचे साहित्यिक राजकारणाचा वीट येऊन दूर राहतात,त्यांचे अनमोल साहित्यही दुर्लक्षित राहू शकते.

आपल्याला सृजनाचा ,मानवी भावनांना अलिप्त राहून पाहण्याचा वर लाभलेला आहे.त्याचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग करावा.सवत:च खट्टू न होता नीरक्षीरविवेकबुद्धीने वागण्याची क्षमता असावी.तरच या राजकारणाचा आपल्यावर परिणाम होणार नाही.याचे उदाहरण म्हणजे अटलबिहारी वाजपेयीजी,जे प्रत्यक्ष राजकारणात होते!

माणसांचे भले होणारे साहित्य,चिरकाल टिकणारे साहित्य निर्माण होईल,ही आशा राजकारणापलीकडे पाहताना जिवंत ठेउया.


सौ.अर्चना मुरुगकर.

तळेगाव दाभाडे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लावणी

हरकत नाही

मावळ सौंदर्य आणि सोनकुसूम पुष्पौत्सव' :