सुभाषिते व मराठी अर्थ : भाग १
भाग
१
संस्कृतमधील सुभाषिते लहान संस्मरणीय श्लोक आहेत.
संस्कृतमधील 'सु' चा अर्थ चांगला,
'भाषित 'चा अर्थ बोलणे ,
ज्याचा एकत्रित शाब्दिक अर्थ 'चांगले बोलणे' असा आहे.
सुभाषिते नैतिक सल्ले, सांसारिक सूचना करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. सुभाषितांमध्ये कवितेतून संदेश दिला जातो.
सुभाषिते नेहमीच वाक्प्रचाररूपात असतात.ती काव्यात्मक स्वरुपात रचलेली असतात आणि भावना, कल्पना, धर्म , सत्य किंवा परिस्थितीचे संक्षिप्त वर्णन करतात .
बहुतेक सुभाषितांचे लेखक अज्ञात आहेत. भारतीय महाकाव्य या स्वरूपात लेखन केले गेले.लोकांच्या स्मरणात असलेल्या सुभाषितांचा संग्रह करून सुभाषित संग्रह तयार केले गेले.
संस्कृत सुभाषितांची गेयता, शब्दमाधूर्य आजही मुलांना आवडते. सुभाषितांमधून मिळणारी शिकवण जन्मभर सोबत असते. आजच्या मुलांनाही सुभाषिते दीपस्तंभसारखी मार्गदर्शक ठरतील, हीच आशा.
1.
पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् ।
मूढै: पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥
अर्थ :
या पृथ्वीवर फक्त तीन रत्ने आहेत. पाणी, अन्न आणि सुभाषिते. मूर्ख लोक मात्र दगडाच्या तुकडयांना "रत्न" असे म्हणतात.
2.
वनानि दहतो वह्ने: सखा भवति मारुत:।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौह्र्दम ॥
अर्थ :
जंगलामध्ये वणवा लागला असताना वारा अग्नीला मदत करतो. मात्र तोच वारा दिव्याची ज्योत (दुर्बल अग्नी) विझवतो. दुर्बलाला कोण मित्र असतो? (कोणीही नसतो)
3.
उद्यमेन हि सिद्धन्ति कार्याणि न मनोरथै: ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृग: ॥
अर्थ :
प्रयत्न केल्यानेच कार्ये पूर्ण होतात. केवळ स्वप्ने बघून (मनोरथे करुन) नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप प्रवेश करत नाही. (त्यासाठी त्याला शिकार करावीच लागते).
4.
क्षणशः कणश्चैव विद्यामर्थं च साधयेत!
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम !
अर्थ :
क्षणा़क्षणाने ज्ञान आणि कणाकणाने धन मिळवावे.क्षणाचा त्याग केल्यास विद्या कोठुन मिळणार आणि कणाचा त्याग केल्यास धन कोठुन मिळणार?
5.
विद्वत्वं च नॄपत्वं च नैव तुल्यं कदाचन |
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ||
अर्थ :
विद्वत्ता आणि राजेपण यांची कधीही बरोबरी होऊ शकत नाही.कारण राजा स्वतःच्या देशातच पूजनीय असतो तर विद्वान व्यक्तीला सर्वत्र मान दिला जातो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा