लॉकडाउन आणि मी

 




    लॉकडाउन आणि मी

 

अचानक लॉकडाउन लागले आणि खरेच वाटेना की आपण काही काम करता घरातच आहोत. करोना विषयीच्या बातम्या, भारताचा कितवा नंबर, कोणत्या सेलिब्रेटीला, नेत्याला झाला, सगळे पुन्हा पुन्हा टीव्हीवर पहायचे. घरातला बदल म्हणजे कामवाली नाही. काय काय गमतीशीर व्हिडिओज आणि मीम्स यावर येत होते. आणि चॅलेंजेस! नथीच्या फोटोंचे, लग्नाच्या फोटोंचे, साडीचे, वेस्टर्न कॉस्च्युम्सचे.


       यानंतर झूम मिटींगस्. व्हिडिओ कॉल्स आणि फॅमिली मिटींगस्. सगळेच ऑनलाइन. जो तो ऑनलाइन.शाळा कॉलेज ऑनलाइन.त्याच्याही गमती-जमती,नाविन्य !जुन्या लोकांचे अडखळत शिकणे तर नव्या मुलांचे लिलया वावरणे चालू झाले.वर्क फ्रॉम होम आणि त्यातील गमतीजमती आणि त्रास चालूच होते. काही बायकांना नवरा त्याचा मोबाईल घरीच असल्याने,नवऱ्याने कष्टाने लपवलेल्या गुप्त कहाण्या सहजगत्या समजल्या. अशीच कोण्या बायकोबद्दलची माहिती मिळाल्यानंतर तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूनी हल्ला केला. अशीही बातमी वाचण्यातआली. लॉकडाउन मुळे पूर्वी मिळालेली स्पेस अचानक डिलीट झाली,घरात राहून खऱ्या नात्यांची विण मात्र घट्ट झाली.



        शेअरिंगच थांबल्यामुळे सगळे काही मोबाईल वरच. रोजच्या रेसिपीजचा फोटो काढलाच पाहिजे आणि लग्गेच टाकला पाहिजे. मध्ये सणवार येत.होळीपासून सुरू झालेले लॉकडाउनचे सत्र पुढे चालूच होते. अगदी सकाळी आठलाच  एखादी सुगरण वहिनी पुरणाचे ताट असलेले फोटो व्हाट्सअप ग्रुपवर टाकत असे. आणि आग्रह करणार, या सगळे जेवायला. हा! हा! येऊच शकणार नाहीत, माहीतच होते. आणि आम्ही सगळे जण आद्य कर्तव्य समजून नाईस, छान असे इमोजी लगेच चिकटवायचो. गच्चीवरील बाग, कुंडीतील हरभरा भाजी, विविध रंगाची फुले. अहमहमिका चालू होती फोटो शेअर करण्याची.जेवढया नव्या, किचकट  रेसिपीज तेवढी जास्त भांडी घासायला पडत असत. योगायोग म्हणजे सगळ्या मुलांना सारखेच डोहाळे लागले होते. भेळ, पाणी पुरीपासून सुरू झालेले चाट बनवण्याचे कौशल्य बास्केट चाटसारख्या कलाकुसरीकडे विकसित होत होते. युट्युब चॅनल्सची चलती होती. डाल्गोना कॉफी, जिलेबी, केक्स या रेसिपीज इन फॅशन होत्या.बर्थडे ला केक असलाच पाहिजे! या नियमानुसार केक सगळे जण शिकत होते आणि स्टेटसलाही ठेवणे चालू होते. माझ्या मुलीच्या (कॉलेजला असणाऱ्या) मित्रांनाही केक मेड बाय मी, मंच्यूरीयन मेड बाय मी, असे स्टेटस ठेवले होते. अरे! आपणच अगदी मागे रहायला नको, म्हणून तिनेही काही काही बनवले. यथेच्छ पसारा आणि भांडी पडत असत. या निमित्ताने घरकाम ही पण कामे असतात, आपणही हे  करू शकतो, हे मुलांना कळले. मला त्या व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत. “हे बनव”. मी ही काही रेसिपीज बनवल्या. रसगुल्ले, मासवडी, जिलेबी.मी मैत्रिणींना थट्टेने बोलले, की पुढच्या वेळी भिशीला आवडीचा मेनू करायला सांगता येईल इतके शेअर करताय. ती म्हणाली पुढे बनवता येतीलच याची गॅरंटी नाही!


खरे तर मनोरंजन 😻🎊🎈🎭, छंद, कला यासाठी कधीही न मिळणारा वेळ मात्र मिळत होता.आणि हो, मिस होणारे स्ट्रीट फुडही आठवत होते.किंबहुना काहीच करता येत नाही या अगतिकेचे हे प्रतिपूरण  होते. स्वत:लाच ओरडून सांगणे चालू होते, "हां, मी आनंदी आहे. स्वस्थ आहे. "



https://youtu.be/UbWuRacWoWE











    लॉकडाउन म्हणजे खरोखरच ' भूतो भविष्यती' अशी घटना होती. समाजातले चित्र अगदी भयावह. कडेकोट बंदोबस्त. अत्यावश्यक सेवेतील लोकांचे मृत्यू. अचानक गावाकडे जाणाऱ्या लोकांचे लोंढेच्या लोंढे.कर्जाचे हप्ते थकले म्हणून कोणी आत्महत्या करतोय तर कोणी नोकरी गेल्यामुळे. कोणाची डेडबॉडी खुर्चीवर पडून होती. कुठे दवाखान्यात आॉक्सीजन उपलब्ध नाही. नाना गोष्टींची दृश्ये अगदी मन हेलावून टाकणारी. सामाजिक आणि आर्थिक घडी अगदीच विस्कटलेली. जागतिक स्तरापासून सुरू होणाऱ्या चर्चा घरात येऊन पोहोचल्या होत्या. पगार कपात, नोकरी कपात सुरू आहे. सगळीकडे अस्थिरता. आजपर्यंत ही अनिश्चितता चालूच आहे.



     विज्ञानाच्या सगळ्या प्रगतीलाच आव्हान! घरातून बाहेर जाणाऱ्या आपल्या माणसाची काळजी. त्याला दिल्या जाणाऱ्या शंभर सूचना. आजूबाजूला सतत येणारे ॲम्बुलन्सचे आवाज सगळे चालूच आहे.

काळ हा बदलत असतो. सगळ्यांनीच आज नाराज होता धीराने,संयमाने वागले पाहिजे.  लॉकडाउनची  नावे  बदलली  तरी  मुख्य  काळजी  तीच.  लवकरच कोरोनाला हरवणारे चांगले चित्र निर्माण होवो हीच आशा!!

 

आणि हो ! हो ! वजन काटा मात्र चढत्या दिशेने आकडे दाखवतोय !!😂😂



टिप्पण्या

  1. अगदी सगळ्यांच्या मनातले लिहिले आहे

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान शब्दात व्यक्त केला आहे हा काळ...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा