१.आई २.आई अनेक रूपात

 


🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
१)आई


आई असते सर्वस्व

बालकाच्या जीवनाचे

बालहट्ट पुरविते

राजपुत्र लाडक्याचे


आई शिक्षिका बाळाची

धडे देते जीवनाचे

शिक्षा, लाड, प्रसंगाने

बीज पेरते मूल्याचे


आई मैत्रीण मुलीची

लाड करी कपड्यांचे

गोष्टी कानी हळू सांगी

घडे चारित्र्य बाईचे


आई आधार घराचा

झाड असे सावलीचे

दूर देशी असे जरी

दु:ख जाणे अंतरीचे


वय नसे बालकाला

साठी किंवा सत्तरीचे

मन विसावे कुशीत

पाट मनी अमृताचे. 


अर्चना मुरूगकर

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀


____________________________________________________

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

२) आई अनेक रूपात


असे अभय आईचे

चिंता काळजी दु:खात

बाळ शिरते कुशीत

मिळे अमृत मायेत


दिसे साक्षात आईच

जगी नर्सच्या रूपात

करी सुश्रूषा रूग्णांची

माऊलीच्या ममत्वात


क्षमा, शांती लेखनात

ज्ञानेशाच्या वचनात

 छळ साहूनी समाजी

पाजी ज्ञानाचे अमृत


दिसे भक्ताला वारीत 

आई विठूमाऊलीत

सांगे काज विठोबाला

येई भेटीला धावत 


असे पिताही माताच

 वसे वात्सल्य तयात

काळजीने शिक्षणाचे

देई धडे जीवनात. 


जरी वंध्यत्व बाईत

असे ममत्व हृदयात

प्रेम वाटते जगात

भाव व्यापक मनात


©अर्चना मुरूगकर

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा