. मुलगी घरची
मुलगी घरची
ती असते मुलगी घरची
ती असते अल्लड वारा
जी अवखळ झराच रानी
जी श्वास घराचा सारा
मी मिरवते तिचा तोरा
जो मम छायेचा वावर
ती बाळ लडिवाळ सदाच
पथ प्रेमाचा तो भूवर
नित नवीन वाटा तुडवी
ध्वज किर्तीचा तो गगनी
पथ प्रगतीचा वर नेई
ती तर झाशीची राणी
गुण समन्वयाचा अंगी
जी जपते सारी नाती
ती सकल संस्कृती जाणे
ती मातृत्वाची महती
ती सोसत दु:खे पचवी
गुण सदाच पेरत राही
ती तेजस्वी तो तारा
जो सदाच चमकत राही
अर्चना मुरूगकर.
मुलगी घरात असणे म्हणजे एक सजग जग आहे. ती काळाबरोबर घराला जोडते. सगळ्या फॅशन आईला शिकवते. भावाला वळण लावते. बाबांकडे ही लक्ष असते. आरोग्याबद्दल मायेने विचारणारी तिच.
वाढीच्या काळात तर तिच्या रूपात चंचला घरात फिरत असते. सारे जुने नवे शिकत असते. घर कसे ठेवायचे, घरात नवीन काय घ्यायचे. अवखळ वाऱ्यासारखी घरभर फिरत असते. सगळ्यांची लाडकी. तिचा अल्लडपणा समजत असतो तरी आईबाबा कौतुकाने पहात असतात. साऱ्या जगाला गवसणी घालायला निघालेली असते. इतकी अवखळ की कुणीही बांधू शकत नाही. सगळ्या घरात ती खूप खूप लाडकी असते. तिच्यामुळे घराला नवी उर्जा मिळत असते. सकारात्मतकतेकडे, नव्या दिशेने घर प्रवास करते.
खरंतर आईबाबांना तिचा खूप अभिमान असतो.आईला तर स्वत:सारखीच वाटते . माझ्यासारखी दिसते. साडी नेसली की कशी गोड दिसते. अगदी मी अशीच दिसायचे.असे आई सतत तिच्याकडे पहात कौतुकाने म्हणत असते. तिने केलेल्या स्वयंपाकाचे केवढे कौतुक! ती एक प्रेमळ छाया असते. सर्वांना प्रेम वाटत असते. मायेचा रस्ताच एका घरून दुसऱ्या घरी पसरवत असते. तिच्यामुळे पृथ्वीवर
प्रेम अस्तित्वात आहे.
आज अनेक नवीन वाटा ती धुंडाळत आहे. एकेकाळी
आपल्या समाजात इंजिनिअरींग ही तिचे क्षेत्र समजले जात नसे. आज ती वैमानिक, राजकारणी, ब्युटिशीयन, चालक, वाहक सगळे काही बनत आहे. जिथे जाईल तिथे आत्मविश्वासाने वागते. कारण आई आज बदलत आहे. नको त्या जुन्या कल्पना टाकून देत आहे. स्वीकारलेल्या क्षेत्रात यश खेचून आणत आहे. घराचा, समाजाचा, देशाचा सन्मान वाढवत आहे.कारण ती आमच्या महान मातांची वारसा आहे. तिच्यात झाशीची राणी रगारगात भरलेली आहे.
आज ती जुन्या नव्याचा संगम आहे. लग्नानंतर दोन घरे जोडते. सर्व नाती सांभाळत असते.ती सगळी संस्कृती जाणून त्याप्रमाणे वर्तन करते.ती म्हणजे जगातील आईपणाची महती आहे. जगाला मिळालेली देणगी आहे.
समाजात उडवली जाणारी जन्मापासूनची लिंगभेदाची वेदना सहन करतच ती पुढे जाते. सोशिकपणा हे तर ब्रीदच आहे.जरी काही ठिकाणी दुजाभाव वाट्याला येत असला तरी
ती जिद्दीने पुढे जात रहाणार आहे. चमकत्या ताऱ्याप्रमाणे
तळपत रहाणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा