ऐटीमध्ये रमू नको (फटका)

 





अधिकाराच्या मस्ती मध्ये मश्गुल बनून बसू नको

भाटांमध्ये रमता रमता सत्य विसरून बसू नको


खुर्चीसंगे अनेक चमचे त्यांच्यामध्ये रमू नको

खुर्ची जाता पळती सारे खेदाने तू रडू नको


शाली फेटे स्विकारताना काटे टाळत पळू नको

कर्तव्याचा पंथ नितीचा  भिउनी मागे पडू नको


आलस्याला गोंजारूनी लाड स्वत:चे करू नको

काकबुद्धिने येताजाता टोचे मारत बसू नको


कल्याणाचे बेगड लावी राजकारणी बनू नको

खुर्चीपायी लांगुलचालन खोट्यासंगे फिरू नको


करणाऱ्याच्या कामामध्ये खोडे घालत हसू नको

कास धरण्या सत्याची मग लाजत मागे सरू नको


माझे माझे मानत सारे लोभामध्ये बुडू नको

हळूच निसटू जाता सारे नाराजीने रडू नको


द्वेषभाव अन दुष्टाव्याने कामे सारी करू नको

पेरशील जे उगवे सारे हेच विसरून फिरू नको


व्यापकदृष्टी मनात नसता आव आणून जगू नको

ढोंग दाखवत कौसल्येचे मंथरा मनी बनू नको


झाकत साऱ्या चुका स्वत:च्या टिमकी मारत फिरू नको

परनिंदेची कास धरूनी  ऐटीमध्ये रमू नको. 


अर्चना मुरूगकर🌹

तळेगाव दाभाडे. 





टिप्पण्या

  1. अतिशय मार्मिक फटका आहे ,भाषेवरील प्रभुत्व ,सत्यत्वाची जाणीव करून देणार आणि उत्तम मार्गदर्शन ठरेल असा फटका आहे हा...खूप खूप शुभेच्छा असेच लिखाण होत राहो ही सदिच्छा ,💐🌷🌹

    - प्रविणकुमार हुलावळे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा