असेही एक व्ह्यॅक्सीन यावे
विस्मृतीचेही व्ह्यॅक्सीन यावे
की मी तुला पूर्ण विसरावे
नकोच तो एक लपलेला कप्पा
मुक्त होऊन एकटे जगावे
नकोच पुन्हा ते हृदय पिळवटणे
विरही अतृप्त भाव सोसणे
वर्तमान नसलेल्या चित्रगुंत्याला
मिटवावे जादूच्या खोडरबरने
पुन्हा नव्याने सुख दु:ख नको ते
हेलकावणाऱ्या भाव दोलकांचे
मुक्त व्हावे साऱ्या बंधनातून
व्हावे राजे आपापल्या मनांचे
विसरून जावे जग आपले ते
नसावे कसलेच ताणतणाव
हलके होऊन मोरपिसासम
तरंगावे स्वानंदी मानस भाव
अपेक्षाभंगाचे दु:ख नसावे
रेषांचे कुंपणच न दिसावे
पुन्हा जखडणाऱ्या स्वप्नसाखळ्यात
अभिलाषांचे तोरण न दिसावे
नकोत पुन्हा प्रश्न नवनवे
नकोत उत्तरे मन दुखावणारी
हळवी फुंकर वर येणारी
ओढ नवी जवळ आणणारी
नकोच जबाबदारी नात्यांची
पुन्हा सुप्रभात म्हणण्याची
त्यानंतर नव्या प्रतिक्षांची
मने सांभाळत जपण्याची
हळूच पहावे अंतर उकलून
प्रेमाच्या कक्षा विस्तारून
हित जपावे पहात दुरून
घ्यावे आनंदमोती प्रेमसागरातून
अर्चना मुरूगकर🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा