पुन्हा एकदा
पुन्हा एकदा वाटते भेटावे
सारे बंध हळूच सोडावे
खांद्यावरती डोके ठेवून
भळभळणारे मन वाहू द्यावे
न सांगता भाव माझे
अचूक तुला सारे कळावे
ऊन स्पर्शाने अश्रूंच्या
अंतर सारे क्षणात मिटावे
अश्रू तुझे पुसता मग
आव आणूनी ज्ञान द्यावे
सारे कळता वैद्य होऊनी
स्वतःच स्वतःला औषध द्यावे
मिठीत तुझ्या हळूच विरावे
घट्ट मिठीत जग विसरावे
आधाराचा हिमालय होऊन
सारे दु:ख क्षणात टिपावे
नसते जग मग आज जसे हे
थोडे नक्कीच वेगळे असते
हात हातात नाहीत आता
भकास पडिक स्वप्न उरते
अनुभूतीच्या तरल भावात
अंतर सारे भरून जावे
प्रेमरूपी विशाल दर्यातले
अबोल मोती अलगद घ्यावे
अर्चना मुरूगकर 🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा