(कविता) हवी माणसे सदा भोवती
मात्रा-8+8+8+3
वृत्त -समुदितमदना
*हवी माणसे सदा भोवती*
कुणा म्हणावे आपले असे प्रश्नच पडतो मला
मुखवट्यातुनी गोड बोलुनी फसवत जाती मला
डोळे मिटुनी स्वार्थ साधती मांजरापरी खरे
तोटा सारा विसरते तरी खंत बोचते मला
निस्वार्थी जी खरी माणसे देतच जाती मला
बनते ओझे घेता घेता मीच कोसते मला
टाळत जाते उभी रहाते पायावरती जरा
अंतर राखत जगणे अता बरे वाटते मला
मेळ्यामध्ये आप्तजनांच्या हरवत जाते जरा
बनते जत्रा आयुष्याची गरगर फिरते पुन्हा
संभ्रम सोडत स्विकारते मग असती त्यांना तशी
शुद्ध मनाची तशी माणसे भेटत जाती पुन्हा
अशी माणसे तशी माणसे कशी माणसे जरी
हवी माणसे सदा भोवती असे वाटते मला
स्वत:लाच मी वळवत जाते जाणत जाते जगा
प्रेमच द्यावे प्रेमच घ्यावे असे वाटते मला
अर्चना मुरुगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा