तूच बेभान व्हावे

 

*छंदोरचना 




*तूच बेभान व्हावे*


तनाने भिजावे मनाने भिजावे

अशा श्रावणी खास पाऊस धारा

असा मास आला जगी उत्सवाचा

क्षणी ऊन येई क्षणी चिंब धारा


धरेने नहावे तरुंनी नहावे

पुन्हा जीवनाचा नव्याने सहारा

तृणांनी दवांच्या मण्यांना धरावे

धुमारे मनाला जलाचा शहारा


नदीने झऱ्याने खळाळा वहावे

सरी नाचताना सुखाचा नजारा

घनांच्या पखाली झडींचे तराणे

घुमे गर्द रानात ओलाच वारा


सणांच्या दिसांनी घराने खुलावे

सवे फेर घ्यावे नवे गीत गावे

सजावे धजावे मुलींनी सुनांनी

सग्यांच्या मधे जीवनी बागडावे


धरित्रीतल्या गंध मोदात साऱ्या

मनुष्या अरे तूच बेभान व्हावे

ऋतू संगतीने जगी सुंदराने

कधी काव्य व्हावे कधी नृत्य व्हावे


अर्चना मुरूगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा