रसग्रहण

 *_🌈गझल नक्षत्र  🌈_* 


*गझल क्रमांक ०१*

 

*मनाचा मनाला जिथे ठाव नाही*

*नकाशात माझ्या तुझे गाव नाही*

गझलकार म्हणतात की, आपली मनेच

जुळत नाहीत तेव्हा मी तुझ्याबद्दल विचारच करणार नाही. माझ्या नकाशात तुझे गावच नाही. 


*नको मंथनाचे तुझे चंद्र मजला*

*तुझ्या अमृताची मला हाव नाही*

समुद्रमंथनातून चौदा रत्ने जी मूल्यवान रत्ने निघाली त्यांच्यात चंद्रमा ही आहे. गझलकार म्हणतात की असे खूप मूल्यवान असलेले, मंथनातून निघालेले

पण तुझे असलेले चंद्रही नको आहेत. 

अमृत प्राशनाने देव अमर झाले होते. पृथ्वीवर त्याची ज्याला त्याला हाव आहे. पण नाकारलेल्या नात्यातून येणारे काहीही नको आहे. असे येथे म्हटले आहे. 


*जगा सांगते वेस फोडून टाहो*

*इथे चोर सारे कुणी साव नाही*

वेस, गावाचे प्रवेशद्वार. गावात प्रवेश करण्यापूर्वी ती स्वागत करत असते. पण वेस आता गावात येणाराला सावध करत आहे. इथे राहणारे चोर आहेत. तुम्हाला लुबाडतील.कोणीही सावंत उरले नाही. आश्रयाला येऊ नका. 



*नसे गंध याला फुलांचा जराही*

*मला वाटते हा तिचा घाव नाही*

जरी प्रिय व्यक्तीने दिलेले घाव वेदनादायी असतात त्यासोबत काही हळव्या आठवणीपण असतात. म्हणून गझलकार म्हणतात की या कोरड्या आठवणी, खूप दूर गेलेल्या अनोळखी वाटत आहेत. त्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या असू शकत नाहीत. खूप दुरावा निर्माण झाला आहे. असा याचा अर्थ आहे. 


*असा सूर्य येथे कुणी पाहिला रे?*

*घनांचा नभी ज्यास घेराव नाही*

प्रत्येक तळपत्या व्यक्तिमत्वाने आयुष्यात कधी ना कधी कठीण काळ पाहिलेला असतो. 


*मला जाण आहे पुन्हा रंगण्या हा*

*जुन्या सोंगट्यांचा जुना डाव नाही*

जरी जुन्या आठवणी दूर गेलेल्या आहेत तरी त्यांच्याबद्दल आस्था आहे. 

म्हणून आताच्या सोंगट्यांनी डाव रंगणार नाही असे गझलकार म्हणत आहेत. 


*इथे प्रश्न सोकावले फार आता*

*कुठे उत्तरांना जरा वाव नाही*

प्रश्नांची संख्या वाढली म्हणजे जीवन समस्याग्रस्त  बनले आहे. त्यात उकल होण्याला वावच नाही. बाहेर पडण्याचे

मार्गच बंद झाले आहेत. 


*अता मी जगाया निघालो नव्याने*

*नका शोध घेऊ .. मला नाव नाही .*

पूर्वीची ओळख,धारणा सर्व सोडून मी नव्याने जगात प्रवेश केला आहे. माझे अस्तित्व जाणण्यासाठी मला शोधू नका. कारण तुमच्या प्रसिद्धीच्या दुनियेत मला नाव नाही. 

तुमच्या आखणी बाहेरील, आडाख्यांबाहेरील, माझ्यासाठी योग्य असणारे जीवन मी जगत आहे. 


_*✍️गझलकार शंतनू कुलकर्णी*_


अर्चना मुरूगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा