गझलगंध
🔹 *गझल* 🔹
सुगंधाच्या तराजूने फुलांना तोलतो आता*
*हवा ही बोलकी झाली हवेशी बोलतो आता
फुलांचा आकार, रूप न पाहता तुलना करताना गझलकार सुगंध ही बाब लक्षात घेणार आहेत. जो आपोआपच हवे सोबत येतो. जो अदृश्य आहे, जाणवणारा आहे. अर्क आहे, बेधुंद करणारा आहे त्याची खरी ओळख दाखविणारा आहे. एक हळूवार कल्पना आहे.
माणसाची कार्यकिर्ती अशीच असते. त्याची ओळख असते. ती किर्ती हवे प्रमाणे पसरणारी असते. ही जाणून घेण्याचे प्रयत्न गझलकार करत आहेत.
* हा एकदा जेव्हा दिला आधार शब्दांनी*
*बघा आकाश ताऱ्यांचे कसे मी तोलतो आता*
शब्द शक्ती, शब्द ताकद, शब्द आधार
आहेत. त्यामुळे कोणत्याही मोठ्या पदा शिवाय खूप मोठा अभिव्यक्तीचा अधिकार प्राप्त झाला आहे.
आकाश हे व्यापक, विशाल आहे. तारे या जणू विविध कल्पना आहेत. शब्दांमुळे कवी लीलया असा हा भार पेलत आहे.
*जयांना स्पर्शण्या भीती सदा वाटेल डोळ्यांना*
*अशा अस्पृश्य अश्रूंची तिजोरी खोलतो आता*
जी अनेक दडवलेली दु:खे आहेत, ती सहजतेने कवी काव्याच्या माध्यमातून व्यक्त करू शकतात.
एकाचा उल्लेख करणे देखील दु:खदायक आहे. पण या माध्यमातून कवी अनेक दु:खे सहजतेने मांडू शकतो. तिजोरी म्हणजे काळजात
जपून ठेवलेल्या आठवणी आहेत.
*फुलांनी घाव केलेले किती गोंजारतो मित्रा*
*अरे काळीज माझे मी नखाने सोलतो आता*
प्रिय व्यक्तीने केलेले घाव पुन्हापुन्हा आठवतात. गोंजारतो असे इथे म्हटलेले आहे. ही एक कैफियत आहे.
पण ती आठवण स्वत:जे काळीज नखांनी सोलणे... अत्यंत वेदनादायी आहे.
*अशी ही कोणती मदिरा दिली पाजून मृत्यूने*
*उभा हा जन्म झिंगूनी खुशीने डोलतो आता*
मृत्यू हे अंतीम सत्य आहे,हे सगळ्यांना माहीत आहे, तरी काय जादू आहे ही, माणूस आशा, आकांक्षां च्या गर्तेत मिथ्या जगात आकंठ बुडालेला असतो. शेवटच्या श्वासापर्यंत गुंतलेला असतो.
मृत्यूने मदिरारूपी जगण्याची भुरळ घातली आहे. त्या नशेतच माणूस हरवलेला आहे, जगण्याचा आनंद घेत आहे.
- *श्री. श्रीकृष्ण राऊत*
अर्चना मुरूगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा