गझल रसग्रहण (निखारा)

 निखारा

""""'"""""

*शांतपणे मी अवघड जगणे जगत राहिलो*

*सुखस्वप्नांच्या भासावरती झुलत राहिलो*


आजचे जगणे अवघड आहे तरी मी ते तक्रार न करता जगत आहे. त्या दु:खात असूनही सुखाचे भास मला होत राहिले. येणाऱ्या सुखाच्या आशेवर मी जगत राहिलो. 


*अवती भवती जमले सारे सगेसोयरे*

*स्वार्थ साधून निघून गेले कुढत राहिलो*

सगेसोयरे फायद्यासाठी जवळ आले होते. त्यांचे काम झाले की निघून गेले आणि मी मात्र त्यांच्या आठवणीने आणि असा संधीसाधू पणा पाहून मनातच पुन्हा पुन्हा दु:ख करीत राहिलो. 



*किती उन्हाळे जाळत गेले माहित नाही*

*धोकादायक वळणावरती वळत राहिलो*

नेहमी येणाऱ्या वंचनांमुळे गझलकाराचे मन दु:खी आहे. संकटामुळे होरपळले आहे. तरीही धोका पत्करुन, आव्हाने स्विकारुन जीवनात पुढे जाणे चालू आहे. 


*जिकडे तिकडे रानभुलीच्या वाटा होत्या*

*कुठे निवारा सापडतो का बघत राहिलो*

जो मार्ग चोखाळावा तो भूल घालणारा फसवा निघत आहे. यामुळे जिवाला कोणताच दिलासा आधार राहिलेला नाही. 

अशाही स्थितीत जिद्द न सोडता निवारा, आपल्या हक्काची विसाव्या ची जागा माणूस शोधत असतो. 


*किती लांबचा प्रवास झाला कळले नाही*

*वरवरच्या का मुलाम्यास मी भुलत राहिलो*

अप्राप्य आवडणारी गोष्ट ही आपल्या योग्यतेची नव्हती हे जेव्हा कळते तेव्हा खरोखरच स्वत:बद्द्ल वाईट वाटते की आपण वेळ का वाया घालवला? मृगजळापाठीमागे धावत केवढा प्रवास केला असे वाटते. 


*कधी तरी मज वाटत होते भेटशील तू*

*तुझ्याचसाठी जीवनभर मी फिरत राहिलो*


कविता, गझल, प्रेयसी या कधीतरी 

भेटतील या आशेने प्रयत्न चालूच असतात. आशा ही मनाच्या आत तग धरून असते. भेटण्यासाठीची तगमग प्रयास जीवनप्रवासा इतकेच अखंडपणे चालू असतात. 

*राख जरी मग झाली माझी हरकत नाही*

*शब्द होऊन जसा निखारा फुलत राहिलो*


काव्य प्रगटीकरणात पूर्ण जीवन अर्पण करण्याची कवीची इच्छा आहे. 

आपल्या देहरूपी जीवनाचे अंतिम रूप म्हणजे मृत्यूनंतर राख होणे.सृजनाचा क्षण येईपर्यंतच्या क्षणा पर्यंत होणारी जी तगमग आहे त्याने माझी राख जरी  झाली तरी मला त्याची तमा नाही. 

परंतु माझे साहित्य तेजस्वीपणे तळपत राहिल. मी त्या रूपाने निखारा बनून जीवंत रहाणे पसंत केले. 


—शांताराम हिवराळे

पिंपरी,पुणे

9922937339


*सौ. अर्चना मुरूगकर*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा