*मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*

 *रविवार लेख उपक्रम*

दि.१५/१/२०२३

*मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*

*मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*

     आपले सगळेच सण उत्सव हे निसर्ग, शेतीप्रधान जीवनपद्धती, मौसमी फळे -भाज्या यांच्याशी निगडीत आहेत. पौष महिन्यात रथसप्तमीपर्यंत  होणारी आदित्य राणूबाईची पूजा, दर रविवारी केली जायची. त्याच्या कथा ऐकल्या जात असत.  त्यातून मिळणारा संदेश उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.. हे कानात घुमत असते. या रविवारची,रथसप्तमी ची पूजा, रांगोळीने चंदनाच्या पाटावर सूर्य, रथ रेखाटणे अशी होत असे. यातून प्रिंट मिडिया खूप प्रगत नसताना भौगोलिक ज्ञान,जीवन यांची सांगड  संस्कृतीच्या माध्यमातून  पुढच्या पिढ्यांकडे गेली. 

बिब्याची फुले, करडईचे फुले यांना महत्व असायचे. बिब्याची फुले वातहारक आहेत. प्रत्येक देवतांच्या आवडत्या फुलांमध्ये काही वैशिष्ट्ये दडली आहेत. पिवळे, तपकिरी असे हे करडई फूल सूर्याच्या तेजस्वी पणाचे द्योतक आहे. 


भोगविडे,संक्रांत, कर आणि महिनाभर चालणारे हळदीकुंकू असे उत्सवी बायकांच्या गोटातले वातावरण  संक्रांती निमित्ताने चालू असायचे. भोगीला सात विड्याची पाने, सात सुपाऱ्या तिळगुळ लाडू हे सात सवाष्णींना देणे, त्यांचे पाय धुणे, मसाला दूध देणे, फुलांची वेणी, फणी, काजळ, बांगड्या हे सगळे जसेच्या तसे आठवते.यामुळे पान , सुपारी या बहुगुणी जिनन्सांचा समावेश टिकून राहिला आहे. विचारांची देवाणघेवाण, संस्कृतीची देवाणघेवाण, गरीब - श्रीमंत दरी मिटणे यासाठी याचा नक्कीच उपयोग होत गेला.आता समाजातल्या स्त्रियांची स्थिती बदलण्याच्या दृष्टीने विधवांचेही हळदीकुंकू होत आहे. 

वाळूक(मराठवाड्यातील पदार्थ), पेरू, ऊस, बोरे, घाटे, वांगी, पावटे इ. यातले बहुतांश पदार्थ शेतीतून उपलब्ध होणारे होते.

नैवेद्याला बनवले जाणारे पदार्थ, जेवणात केले जाणारे पदार्थ यामुळे ऋतू आणि आहारमान यांची सांगड घातलेली दिसते. 

प्रत्येक सण- पर्व यावेळी दानाचे महत्व सागितले आहे, जे असंग्रहासाठी फार महत्वाचे आहे. 

काळारंग हा उष्णताग्राहीआहे, थंडीमध्ये संरक्षक आहे. 

तिळ-गुळ स्निग्धता वाढवणारे, जास्त उष्मांक देणारे आहेत.थंडीशी सामना करताना शरीराची उर्जा जास्त प्रमाणात खर्च होत असते. ते भरून काढण्यासाठी हे उपयोगी आहेत. 

यावेळी कुंभाराचा आवा लुटणे असेही 

हळदीकुंकू गावांमधून होते. बॅंडबाजा घेऊन कुंभाराकडे जायचे, त्यामागे सणासाठी सजलेल्या बायका सोबत  मुलं-मुली असे खास दृश्य असते. आवा म्हणजे भट्टीची पूजा करायची. त्यांना कृतज्ञता म्हणून आहेर -शिधा द्यायचा.

यजमान स्त्रिया भांड्यांचा  खर्च करतात. रोजच्या स्वयंपाकघरात लागणारी सर्व मातीची भांडी बनवली जातात. तिथेच हळदीकुंकू व्हायचे. ही भांडी आलेल्या स्त्रियांना दिली जातात.

सर्व दानांमध्ये मृत्तिका दान हे श्रेष्ठ मानले गेले आहे. माती ही प्रसवा आहे. म्हणूनच सुगडे देण्याची पद्धत आहे. आजही आपण मातीची भांडी अन्न शिजवण्यासाठी योग्य हे मानतो. 

भरला कुंभ (सुगड), सूपाने  त्याचे तोंड दोऱ्याने सुतवलेले असते, यात गर्भाशयाचे प्रतिक दिसते. ओटी भरणे, वाण झाकून देणे हे पुनरुत्पादनाची जाणीव ठेवणारे आहे. स्वत:चा जैविक वारस असणे, वंशसातत्य रहावे हेच आशिष यातून स्रियांना एकमेकींकडून दिले जायचे. स्त्री महत्तेचे एक वैशिष्ट्य अधोरेखित केलेले आहे. विज्ञाननिष्ठ जीवनात ही एक ओढ आहेच. 

याला जोडूनच येणारी कर. बोरांनी ओट्या भरणे, मुलांचे बोरन्हाण यात पुन्हा क जीवनसत्वाने समृद्ध असलेल्या एका फळाचा आहारात समावेश होतो. 

ऋतू बदलाला सामोरे जाणे, बदल स्विकारणे हे या संक्रमणातून समजते.सूर्यसृष्टीत जगणारे आपण!  उर्जेचा प्रमुख स्त्रोत! या नारायणाची पूजा खूप महत्वाची. याचे मकर राशीतील संक्रमण भौगोलिक बदल. तो सांस्कृतिकरित्या आपण साजरा करतो. पतंग उडवून या बदलाचे स्वागत केले जाते. पतंगोत्सवातून सूर्यस्नानाचा लाभ मिळतो. 

गोड बोलणे, अढी सोडणे कठीणच हो! पण या निमित्ताने हे घडते.मानसिक दृष्ट्या संतुलित राहण्यासाठी हे फार आवश्यक आहे. 

यामध्ये काळानुसार काही बदल होत गेले. प्रदेशानुसार काही बदल आहेत.संपूर्ण कारणमिमांसा जाणून काही बाबी टाळल्या जाऊ शकतात. काळाप्रमाणे बदलही झाले आहेत. 

नवनवीन कपडे, छान छान जेवण, खाऊ, गाठीभेटी यामुळे आनंद मिळतो.गाठीभेटी यंत्रयुगात फार महत्वाच्या आहेत. आभासी जगापासून दूर जाऊन एकमेकांची विचारपूस केली जाते. 

आहार विहार आचार विचार या सर्वांनाच चालना देणाऱ्या या पद्धती आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबण्याची रीत नक्कीच आहे. फक्त डोळसपणे पाहिले पाहिजे. 




सौ. अर्चना मुरूगकर✍️


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा