गझलची ओळख आणि सुरेश भट
गझल काय आहे हे माहीत नव्हते. पण
एकदा १७-१८ वर्षाची असताना वाचनाच्या सवयीमुळे मिर्झा गालिब यांचे चरित्र असणारे पुस्तक वाचण्यात आले होते.
या सुरेश भटांच्याच रचना आहेत, हे माहीत नसताना आशाजींनी गायलेली त्यांची अनेक गाणी खूप आवडायची.
एकूणच पद्य लेखन करताना गझलेची फार लवकर ओळख झाली. गझल लेखन वाचन दोहोंचाही आनंद खूप वाटतो. मा. सुरेश भटांच्या गझलांची गोडी अवीट आहे. ते या क्षेत्रातील अढळ स्थान आहे.
त्यांच्या जीवनावर आधारित पूर्वी केलेली एक रचना पुढे देत आहे.काही कमतरता असू शकतात. पण आदरभाव खरा आहे.
आपण या गझलपंढरीचे एक वारकरी, एक कण म्हणून भाग्यशाली आहोत ही भावनाही त्यांच्या प्रती जवळचे नाते दृढ करत असते.
या निमित्ताने मा. विजय जोशी सरांचे ही ऋण व्यक्त करते. 'जे जे ठावे आपणासी.. ' या उक्तीप्रमाणे ते गझल कार्यशाळा घेत असतात , मार्गदर्शन करतात आणि शिष्यही घडवतात.
एका विशाल सागराला काही ओळींमध्ये मांडण्याचा हा अल्पमती प्रयत्न. धन्यवाद!
मन दु:खात रंगले बहुधा
सुख त्यालाच मानले बहुधा
नशिबाशीच रोजचे लढणे
क्षण शब्दात सांडले बहुधा
जगण्यानेच मानता परके
कवितेनेच जाणले बहुधा
छळणारेच भोवती सगळे
रसिकांनीच बांधले बहुधा
मतला शेर हेच ते जगले
गझलांनाच कोरले बहुधा
सौ. अर्चना मुरूगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा