स्त्री आणि स्वयंपाकघर

 *रविवार लेख उपक्रम*

दि.२/४/२०२३

*अजूनही स्वयंपाक या प्रकारात स्त्रियांची मक्तेदारी आहे का?*

     

खरे तर हा प्रश्नच अवास्तव आहे. आज 

स्त्रिया माझी ही मक्तेदारी आहे, कुणीही हस्तक्षेप करू नका असे सांगतच नाहिएत!

ही फक्त स्त्रियांची जबाबदारी आहे का? हा प्रश्न योग्य वाटतो.असे अनेकांना वाटते. ज्यांच्या अंगवळणी घर पडले आहे त्या आई, आजी, सासू, नणंद, जाऊ इत्यादी सर्वांना.सून सोडून. 

पुरुषांनाही ही जबाबदारी फक्त स्त्रियांची आहे असे वाटू शकते, जेव्हा आयते हातात घेण्याची सवय लागलेली, लावलेली असते. 

खरे तर मुलांचे संगोपन, घरात सुरक्षित रहाणे यासोबतच हे आलेअसावे. युद्ध, शेतीतली कठीण कामे किंवा अध्ययन यापासून स्त्रिया दूर होत्या, नजीकच्या भूतकाळात. 

खरे तर स्वयंपाक हे पण शास्त्रच आहे. तो पण आपल्या माणसांसाठी प्रेमाने रांधावा लागतो. त्यात येणारे अनेक बारकावे, घरातल्यांच्या आवडीनिवडी जपाव्या लागतात. यासाठी निवांत वेळ, सराव, कौशल्ये, सहजता असे टप्पे येत जातात. 

राहिला प्रश्न स्त्री - पुरुष आणि स्वयंपाक असा! 

आता मुलींचे जीवन मुलांइतकेच नोकरीसाठी, कामधंद्यासाठी स्पर्धात्मक बनले आहे. तीची जडणघडण फक्त उद्याची आई, बाई म्हणून राहिली नाही. घरासाठीचा वेळ मर्यादित बनला आहे.लग्नानंतर अचानकच ती अष्टभुजा बनून सगळे एकाच वेळी करू शकत नाही. एकाच वेळी तिच्याकडून अठराव्या शतकातली स्त्री, व्रतवैकल्ये, बालसंगोपन आणि एकविसाव्या शतकातील कमावती बाई अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. 

यामुळे एका निरोगी कुटुंबासाठी घरात येणारे वाणसामान,भाज्या, स्वयंपाक, पोषण याचा घरातल्या सर्वांनी विचार केला पाहिजे. कामे वाटून घेतली पाहिजेत. 

बहुतांश ठिकाणी थोडे वेळापत्रक बिघडले की स्वयंपाकाला वेळ मिळत नाही, खाऊचे,जेवणाचे पार्सल्स घरी येतात. नकळत ही सवय बनून जाते. 

कौशल्यपूर्ण फराळाचे ,जेवणाचे पदार्थ घरी बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वेळखाऊ नसणारे, सुटसुटीत पदार्थ पटकन बनवले जातात. कारण नियोजन करण्याएवढा मानसिक निवांतपणा आज स्रियांजवळ नाही. 

भुकेच्या वेळी डोळ्यांना दिसणारे सारे चमचमीत, बाहेरचे पदार्थ गोड वाटतात. पुढे अनारोग्याला कारण ठरतात. 

यासाठी स्त्री -पुरुष दोघांनीही ही जबाबदारी उचलली पाहिजे. 

यात शहरी, निमशहरी, ग्रामीण अशा वास्तव्यानुसार काही फरक आहे. नोकरीच्या ठिकाणाचे अंतर, जाण्यायेण्याला लागणरा वेळ ,स्वरूप हे सर्व वेगळे असते. तरी दमल्या -भागल्या बायका हे काम, बाहेरच्या कामाच्या तणावाला सहन करत, करत असतात. हौसेने जुन्या-नव्याचा समन्वय साधत असतात. 

यासाठी "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" याप्रमाणे हे काम सगळ्यांनी सगळ्यांसाठी स्वीकारावे. घरातल्या मुलामुलींनी ही! स्त्रियांनीही सर्वांची मदत घ्यावी. 


सौ. अर्चना मुरूगकर

तळेगाव दाभाडे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा