धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

 


धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*


धबधब्यावरील अपघातांच्या घटना या मनाचा थरकाप उडवणाऱ्या असतात.टी.व्ही वर नातेवाईकांचा दाखवला जाणारा विलाप सहवेदना निर्माण अरणारा असतो. का? का? का गेले असतील हे? हा एक क्षण टळला असता तर? कशाने तरी ती छोटी मुले वाचली असती तर? हे पुन्हा , पुन्हा मनात येते. अनेक ठिकाणी या घटना नेहमीच होत असतात.रात्री उशिरापर्यंत, पावसापाण्यात जखमींना किंवा पार्थिव शरीरांना शोधणाऱ्यांचीच काळजी वाटते. एवढा निसर्ग त्यावेळी अनियंत्रित झालेला असतो.लोणावळ्यातील घटना, मागच्या वर्षी हरिश्चंद्र गडावरील पावसात अडकलेली मुले,त्यात गेलेला एक छोटा मुलगा.गड चढताना होणारे अपघात ,हे सगळे आठवत असते.मध्यंतरी एक रीलस्टार मुलगी गेली. 

या सगळ्यामागे वेगवेगळ्या मानसिकता आहेत. तरी आनंद मिळवणे हा एक समान हेतू आहे. ऋतूबदल हा मनाला सुखावणारा असतो. निसर्गाचे विलोभनीय  दृश्यही सगळ्यांनाच भावते. माणूस रोजचे रहाटगाडगे ओढत असताना अनेक आनंदांना मुकतो. अचानक कुठे तरी हे वेगळेपण पाहून उत्सुकता, आवड वाढत जाते. त्यात तो गुंतत जातो. 

आनंदाच्या कल्पना आता बदलत आहेत. तरूण - तरूणी बाहेर शिक्षणासाठी राहतात, त्यांच्या आईवडिलांना या धोकादायक कृत्यांची कल्पना नसते. कुठल्याही पूर्ण ज्ञानाशिवाय पर्यटन क्षेत्रांवर आकर्षक युट्युब व्हिडिओ बनतात. याच्या आधारावर लोक फिरायला जातात. कुठल्याही शास्त्रीय माहिती शिवाय वाहत्या पाण्यात लोक आनंद घेतात. धबधबा हा उर्जेचे, प्रवाहीपणाचे, जिवंतपणाचे अत्त्युच्च प्रतीकच असते. त्यातील शक्य तितक्या मोक्याच्या ठिकाणापर्यंत लोकांना जायचे असते. तिथले सेल्फी, फोटो विटनेस करायचे असतात.भले ते धोकादायक असले तरी. नियमित ट्रेकिंग इत्यादींचा अनुभव नसणारेही धडाधड ग्रूपमध्ये सहभागी होतात. कुटुंबासोबत जाणारी मंडळी, सुखाने कुटुंब प्रमुखावर अवलंबून असते. तो अज्ञानी असेल तर आनंदच! त्याचप्रमाणे व्यस्त जीवनशैलीतून बाहेर पडणारे! कोणीतरी प्लॅन करतो, बाकी मेंढरांसारखे सहभागी होतात. तरूणांचे समूह त्यात मद्यपान व अशा आनंदासाठी जाणाऱ्यांची हुल्लडबाजी वेगळी! एकूणच माणूस अनुकरणशील असतो. पर्यटनस्थळी गेल्यानंतर कोणी भिजताना प्रवाहात बसताना पाहून बाकीचेही बसतात. कुणी मनोरे करत असतात तर बाकीचेही तसे फोटो काढतात.लहान मुले या वाऱ्यात कुडकुडत असतात. प्रवाहात पूर्ण बुडतात. कर्जतजवळ सोलनपाड्याला अत्यंत गर्दी असताना अशी अनेक विकृत दृश्ये पाहिली होती. बाहेर पडतानाच्या धावपळीत अनेक जखमींना उचलून नेतानाही पाहिले.तो एक स्वतंत्र लेखच होईल.पण आनंदात मग्न असताना , माणूस आजूबाजूचे जग आणि धोके पूर्ण विसरून जातो.धबधब्याचा नाद, स्पर्श, एकमेकांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्यकारक आनंदाचे भाव, यात गुंगतो. पाण्याचा वेग, त्याला प्रतिकार करणे याचा नाद लागतो.आपल्या कुटुंबियांना विस्मयकारक आनंद मिळावा, यासाठी साहस वाढवत असतो. त्यात अचानक मृत्यूला जवळ पाहून मन सुन्न होते.तोवर त्याच्या हातात काही राहत नाही. पाणी, वायू, अग्नी या शक्ती आहेत, हेच तो विसरतो. आनंदाच्या चुकीच्या कल्पनांमुळे,निसर्ग शक्तीची क्षमता न कळल्याने मृत्यू उद्भवत आहेत. 

आनंद ही अनुभूती आहे. स्वतःला जाणवण्याची बाब आहे, याचे विस्मरण होत आहे. त्याचा फोटो काढून, (नेमक्या चौकटीतला)  हा आनंद सर्वांना दाखविण्याची रीतच बनली आहे.तसे धाडसी रेकाॅर्ड करणारे मोजके लोक होते, पण आता सर्वच जण पोस्ट करत आहेत.त्यासाठीची धडपड सर्वत्र दिसते. 

पर्यटन हा एक व्यवसाय म्हणून पैसा कमावणाऱ्यांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. उन्हाळ्यातच प्रीबुकींग झालेले असते. आधीच पेपरमध्ये गर्दी होत असलेल्या बातम्या येतात. बाकीच्यांना प्रेरणा मिळते, तेही का मागे राहतील? पळतच या ठिकाणी निघतात. दुरून येणाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळ, सोयी, धोके कशाचीच कल्पना नसते. तसेच मोठी माणसे सगळीकडेच हजर असतात. कुणी मेले तरी बाईट देतात. लगेच चार दिवसांनी व्यापाऱ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा धबधब्यावर जत्रा भरते!त्यासाठी परवानगीही ते  देतात. तारतम्याने विचार करून काही ठिकाणी प्रवेशबंदी असायला हवी.जीवरक्षक प्रणाली असावी. धोक्याची कल्पना देण्यात यावी. कायमस्वरूपी उपाय करावेत.किमान निसर्गाने रौद्र रूप धारण केलेले असताना प्रवेशबंदी करावी. ते रूप पहाण्यासाठी तरी गर्दी करू नये. 

एकूणच वैयक्तिक पातळीवर आनंद मिळवण्याच्या सवंग कल्पनांमधून बाहेर पडण्याची गरज आहे. 


अर्चना मुरुगकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हायकू

जाणता राजा