नागपंचमी

 नागपंचमी


खरोखरच विहंगम असे श्रावणाचे चित्र!  

हा सणांचा महिना! श्रावणी सोमवार, शुक्रवार यातून श्रावणाची गंमत सुरू होते.  

बेल, आघाडा, केणा,दुर्वा, फुले गोळा करताना बारकाईने हिरवी सृष्टी बघायला मिळते. पूजा, मंगलमय आरती याने भारावून गेल्यासारखे वाटते. 

     नागपंचमी हा एक श्रावणातला सुंदर सण! या दिवशी नागाची पूजा करण्यासाठी वारुळाला म्हणजे नागोबाच्या मंदिरात बायका जातात. बांगड्या, नेलपेंट, रिबिनी,नवे कपडे याची गंमत असते.हातावर मेंदी लावली जाते. हिरवागार निसर्ग, लालबुंद रंगलेली मेंदी हा संगम आनंददायी वाटतो. एक बदल! यातून सौंदर्यदृष्टी विकसित होते. ज्वारीच्या  लाह्यांचा प्रसाद असतो. फोडणीच्या लाह्या, दही मेतकूट घातलेल्या लाह्या असे पदार्थ खायला मिळतात. ज्वारी हे कोंडायुक्त भरडधान्य त्याच्या भाजून बनवलेल्या लाह्या पचायला हलक्या असतात. 

 पंचमीदिवशी उकडीचे पदार्थ करतात. मुटके भात, पुरणाचे दिंड,ओल्या शेवयांची खीर हे या ऋतूमानात पचणारे ,हलके असे अन्न! वडिलांचे,भावांचे डोळे धुवून औक्षण केले जाते. डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्वाचे आहे.  नागपंचमीच्या कथा या शेतीजीवनाशी निगडित आहेत.नाग हा शेतकऱ्यांच्या जीवनात महत्वाचा आहे.उंदीर धान्य खातात जे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. साप या उंदरांना खात असतात. शेतकऱ्यांची मदत करतात. त्याचप्रमाणे निसर्गातील संतुलन राखण्यासाठी सर्व प्राण्यांचे महत्व आहे.म्हणूनच या सापांना विषारी समजून  मारू नये. त्यांचे कृतज्ञतापूर्वक पूजन करावे हाच संदेश मिळतो.

सणवार साजरे करताना अशा रितीने वैज्ञानिक दृष्टिकोन राखून आनंद घेणे महत्वाचे आहे. 

एकूणच हा श्रावण जेवढा निसर्गात तेवढाच घराघरात नटतो.सगळे वातावरण श्रावणासारखेच ताजेतवाने, हिरवेकंच, टवटवीत दिसू लागते. सृजनातला नवेपणा मनामनातही रुजतो.

वर्षेच्या थेंबामधली निर्मळता मनामनात पावित्र्य आणते सणांच्या रुपाने खुलते. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते... 


झोपाळ्यावर झुलता झुलता मने सयांची भिजती गं

श्रावण म्हणजे सळसळणारी हिरवी राने ओली गं

दुथडी भरुनी नदी वाहते तुडुंब भरती ओढे गं

सांब सदाशिव काठावरती उभे मंदिरी भोळे गं

अवखळ पाणी अनवट वाटा बघून खुलते  निर्मळ मन

नवे कोवळे हरित रेशमी धरा नेसते वस्त्रे गं

श्रावण म्हणजे सळसळणारी हिरवी राने ओली गं. 


अर्चना मुरुगकर

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा