राजस नखरा
शांत ,शुभ्र,मोत्यासारखा टपोरा मोगरा, फुलतो तो फक्त दाहक उन्हाळ्यातच.काही ठिकाणी सरबतात वापरला जातो तर काही ठिकाणी सौंदर्य प्रसाधनात!
चैत्र गौरीच्या हळदीकुंकवाची रंगत हिरव्यागार आंब्याच्या डहाळ्या,लगडलेल्या कैऱ्या,सुगंधी सरबत,हातावर दिले जाणारे अत्तर,गुलाबदाणीतील गुलाबपाणी,तिखटगोड आंबट चव व हिंगाची फोडणी असणारी आंबेडाळ,मंदगंधित कलिंगडाच्या फोडी,वाळा घातलेले माठातले थंडगार पाणी यासोबतच
गौरीच्या झोपाळ्यावर ,अंबाड्यावर असणारी मोगऱ्याची वेणी खास बहार आणते. सुवास आणि गारवा निर्माण करते.सुवासिणींना दिले जाणारे मागऱ्याचे गजरे ही तर मोलाची भेट वाटते.
वसंत ऋतूमधला हा काळ सुगंधित करून जातो. चैत्र महिन्याचं स्वागत हा मोगरा करतो आणि तळपत्या उन्हात मिरवत राहतो. स्वतःचं शुभ्रपण जपतो. आतपर्यंत असणाऱ्या छोट्या पाकळ्या आणि पाकळीमागून वर येणाऱ्या पाकळ्या गूढता ,धुंदगंधितता वाढवतात. दोन पानांमध्ये लडिवाळपणे उमलणारा मोगरा मंदगंधाने जगाला थंडाव्याची साद देत असतो. मोगऱ्याची टपोरी फुलं उमलली की निसर्गाने अत्तराच्या कुप्या उघडल्या आहेत असेच वाटते!
आपल्या प्रिय व्यक्तीने आवडीने दिलेली मोगऱ्याची वेणी किंवा फुले प्रेमाचे दर्शन घडवतात.ज्ञानेश्वर माऊलींचा 'मोगरा फुलला' ,लतादिदींच्या आवाजातून ऐकला की तो
एका धीरगंभीर मंदिराचा गाभारा उभा करतो व भक्तीमय वातावरणाची निर्मिती होते. शेजेवरचा मोगरा प्रणयाचे प्रतीक बनतो तर लांब वेणी ,वेणीवरचा मोगऱ्याचा गजरा, काठापदराची साडी असे दृश्य
पाहिले की हा मोगरा सौभ्यागाचे प्रतीक वाटतो. अहो रिक्षामध्ये समोर लावला तरी वातावरण टवटवीत,थंड,ताजे करतो.खरोखर, मिळालेला प्रत्येक क्षण सुगंधी,मंगल,शीतल करण्याचं देणं लाभलंय या चिमुकल्या फुलाला!
एक गारवा
रंग पांढरा पिवळट थोडा
खुलतो आहे राजस नखरा
कंच हिरव्या जाळीमध्ये
बहरत जाई शांत मोगरा
फूल पाकळी उमलत जाता
कुपी सोडुनी अत्तर पसरे
पानोपानी कळी बहरता
आनंदाने मनही बहरे
कोमल सुंदर ललना जगती
अजून कोमल फूल माळती
बहर चांदण्या फुले अंगणी
हृदय जगाचे उगा जाळती
थंड सुवासिक एक गारवा
पिसे अनामिक मनास लावे
ओढ जिवाला अशी लागते
ओंजळीत मग अलगद घ्यावे
वसंतातल्या सुखात न्हाता
खास आठवण बने मोगरा
गंध अलौकिक सुख पेरते
मनात उरतो सदा मोगरा
अर्चना मुरुगकर
(कविता- काव्यार्चना संग्रहातून)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा