लावणी
.jpeg)
#गोदातीर्थउपक्रम लावणी वृत्त - हरिभगिनी वाट पाहुनी जीव खंगला अधीर झाले मी राया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया कशी थांबवू तुम्हा विना मी या थरथरत्या कायेला तुमच्या डोळ्यामध्ये दिसल्या आतुरलेल्या मायेला गडद गुलाबी नवी पैठणी खंत लागली सांगाया उगाच बाई इतकी सजले फुकाच जाइल हो वाया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया रुबाब तुमचा मनात ठसला तुम्हा पाहुनी गोंधळले नजर रोखुनी कशास बघता उरात माझ्या धडधडले पायामधले बघा लागले पुन्हा घुंगरू वाजाया तुम्हा करीता पुन्हा पटावर धावत आले नाचाया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया नकाच सांगू सबब कोणती लोकांची अन गावाची नजर सांगते तुमची एकच राणी मी हो मानाची पाउल तुमचे का अडखळले इथे लागले थांबाया लाख सोडुनी तुमच्यामध्ये जीव लागला गुंताया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया दंडामध्ये चोळी रुतली कथा सांगते ज्वानीची नाव विसरले गाव विसरले करणी झाली पिरतीची दूर थांबता उगाच बघता कसे लागता भुलवया हुरहुरलेली चंचल हरिणी तुम्हा लागली शोधाया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया. ©अर्चना मुरुगकर