बोलू आपण

 नमस्कार🙏

प्रशांत पोरे सरांच्या या गझलेतील प्रत्येक शेर खास शब्दरचना आणि गहन अर्थ सांगतो. 




       *गझल क्रमांक ०१*

       

 _कधी जाहले तुला अनावर, बोलू आपण_ 

_आणि वाटले बोलावे; तर बोलू आपण_ 


अनावर अशी भेटीची ओढ तुझ्या  मनात निर्माण झाली असेल तर आपण नक्की भेटू असे गझलकार सांगत आहेत. कुठलाही संकोच न उरता त्यावेळी बोलावे वाटले तर आपण नक्की बोलू. 


_तुला भेटल्यानंतर मज इतकेच वाटते_

_मुके राहुदे उभे चराचर, बोलू आपण_ 


भेटल्यानंतर सगळीकडे शांतता आहे आणि तुझा एकेक शब्द मी ऐकत आहे, आजूबाजूला असणारे सर्व चराचर मुके उभे आहे. 


_बोलू आपण, काय सोसले? किती सोसले?_

_जीवनातला हळवा संगर, बोलू आपण_ 

आपल्या माणसाला, आपण जीवन कसे जगलो हे सांगण्याची ओढ आहे. यश मिळवताना कुठे त्रास झाला, कसा पुढे गेलो, हे सांगायचे आहे. आपण एकत्र नसताना कसे जगलो हे सांगायचे आहे. 

त्याचप्रमाणे विरहाचा हळवा संगर जो मनातच राहिला तो सांगायचा आहे. 


_नात्यांना मर्यादा तर ओघाने आल्या_

_नको ढळू देऊस तू पदर, बोलू आपण_


आज हे एवढे जवळचे नाते परके बनत असताना त्याला काही मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या तू मर्यादेत राहूनच बोल. त्या पाळतही बोलू आपण. 


_भेट एकदा, फक्त एकदा, माझ्यासाठी_ 

_दुसरे काही नको, रात्रभर बोलू आपण_ 


 तू फक्त भेट एकदा फक्त एकदा माझ्यासाठी. 

आता कुठल्याच अपेक्षा उरल्या नाहीत. ना प्रेम असण्याच्या, व्यक्त करण्याच्या, मान्य करण्याच्या किंवा खास नात्याच्या. 

एकदा हा शब्द दोन वेळा आल्याने त्याची आर्तता वाढते. 

यावेळी दुसरे काही नको तर रात्रभर बोलू आपण असे गझलकार म्हणत आहेत. 



_दुनियेसाठी तेथे तू अन, मी हा येथे_ 

_अद्वैतावत राखुन अंतर, बोलू आपण_ 


लोकांना वाटते की आपण वेगळ्या विश्वात आहोत. द्वैत नसणे म्हणजे दोन वेगळ्या व्यक्ती न राहता आपण एक बनलेल्या मनामुळे अद्वैत झालो आहोत. एकच असल्या इतके म्हणजे शून्य अंतर राखत मनातील परकेपणा घालवून आपण बोलू. 


_तेव्हा नव्हते शक्य, असू दे; आता आहे_

_स्टोअर कर तू माझा नंबर, बोलू आपण_


याआधीच्या काळात हे शक्य नव्हते पण आता आहे. मोबाईल फोन मुळे, सोशल मिडिया मुळे दूर गेलेले ओंडकेही जवळ आले आहेत. स्थळ, काळ, वेळ आपल्या सोयीने संपर्क साधणे शक्य आहे. 

म्हणून माझा नंबर तू स्टोअर कर, आपण बोलू. 




_बिलगुन ओठांशी अपुला संवाद चालु दे_ 

_बासरीतला हो माझ्या स्वर, बोलू आपण_ 


आपल्यामध्ये एवढी जवळीक निर्माण होऊ दे. 

श्रीकृष्णावर प्रेम करणारे अनेक आहेत. पण बासरीला खास भाग्य त्याच्या अधराजवळ जाण्याचे आहे. अशा या बासरीतला स्वर तू हो, आपण एकतानतेने बोलू. 


_भक्ती नाही, प्रेम पाहिजे त्याच्यावरती_

 _तुला नेहमी म्हणेल ईश्वर, बोलू आपण_


भक्तीमध्येही द्वैतभाव आहे. तो देव करणार आहे ही भावना आहे. परंतु प्रेम हे अद्वैत भाव निर्माण करणारे आहे. परकेपणा घालवणारे आहे. असे नाते असेल तर देव फक्त पावणार नाही तर प्रत्यक्ष बोलेल. एकरूप होऊ. 


बोलणे गरजेचे आहे, बोलण्याची आस आहे, आपण नक्की बोलू, कसे बोलू हे 

विविध रूपकांतून छान सागितले आहे. 



अर्चना मुरूगकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा