नेट फाॅरवर्डस् (लेख)
नेटफाॅरवर्डस आणि घरातील स्वयंघोषित तज्ञ
खरंतर आता हे मेसेजेस खूप सवयीचे झाले आहेत.स्मरणशक्ती शाबूत असणा-यांना ते पाहिल्याबरोबर आठवतात.
नेटवर तर ज्याला ज्याच्यात रस त्याचे अल्गोरिदम बनते,तेच ते पाहणे आणि तज्ञ बनणे ही फुकटची सोय उपलब्ध झाली आहे.
नृत्य,जेवण,खरेदी,आरोग्य,सिनेमा,गेम्स,पाॅर्न,फॅशन्स,शेअरमार्केट,इतकंच कशाला चालू राजकीय घडामोडीतील एखाद्या गोष्टींचे रील्स याला काही मर्यादा नाही ,एवढा मोठा डेटा उपलब्ध होत असतो. 'मी नाही त्यातला' असे म्हणत सावकाश लहानमोठा प्रत्येकजण सोशल मिडिया,आॅनलाईन खरेदी यात गुंतलेला आहेच.जे प्रकर्षाने टाळतात किंवा वयामुळे जमत नाही त्यांना 'फोमो' असतोच.कारण कुणीही याचा संदर्भ देतो,तेव्हा मागासलेपण वाटते.
सल्ले देण्याचा अबाधित हक्क असणाऱ्या वृद्धांनाच आता सल्ले ऐकण्याची वेळ आली आहे.
मध्ये एक उदाहरण पाहिले की एका सासूबाईंनी गौरीच्या वेळी सुनेला हातचे राखून मार्गदर्शन केले,आता ही ताट कशी वाढणार परीक्षा पाहत होत्या,पण तिने छान केले सगळे, नेटवरून पाहिले होते.असा फायदा पण होतो.त्यातल्या त्यात आरोग्य आणि खाद्यपदार्थ हे जवळचे विषय.काहीजण लाॅकडाऊन मध्ये साधे असणारे तथाकथित वैद्य(बुशर्ट पॅन्टमधले) आरोग्यतज्ञ ,आता सुटाबुटात आणि मोठमोठ्या हाॅलमध्ये कार्यक्रम घेत आहेत! कधी कधी पोस्टमध्ये कशात काय मिसळायचे हेच टाकायचे विसरतात!डिग्र्यांची गरज नसल्याने नवऱ्या सोबत बायकाही असतात.एवढं फॅन फाॅलोईंग वाढलंय त्यांचं.
विभक्त कुटुंबामुळे टीप्स सांगणारे असे कोणी नाही,कुकींग रील्स आता तिथे पोचल्या आहेत.
ए.आय. ने केलेली साक्षरता यात एक नंबरची ठरली म्हणे.अनेकजणांचा हॅप्पी न्यू इयरचा प्लम केक यामुळे बिघडला अशी बातमीच होती.चाट जी.पी.टी ने इनग्रेडिएंटस विसरल्यामुळे एका दुकानातलाही केक बिघडला होता ज्याचा त्यांना भुर्दंड बसला.वजन कमी करण्याचे उपाय,योगासनांची माहिती हे पण यात जागा राखून आहेत.
आणि हे अचानक प्राप्त झालेले ज्ञान,मोबाईलमध्ये डोके असल्यावर मला एकट्यालाच मिळाले याचा भास होतो आणि फाडकन कुटुंबियांच्या तोंडावर मारले जाते.एकदा पर्यावरणपूरक नीमपासून बनवलेल्या मस्किटोरिपेलंटची घरात टूम आली.कडूनिंबाचा रस ,तेलात उकळून,तेल जे बनते ते लिक्विडेटरमध्ये वापरले.यासाठी थोडे भांडणही झाले.की इतर गोष्टी कशा ,विषारी केमिकल युक्त आहेत,त्याचा फुफ्फुसावर परिणाम वगैरे होतो,याचा अतिशयोक्ती असणारा ज्ञानाचा डोस पाजून झाला.पण डास काही मरेनात या, हरित उपायाने!यजमानांचे मित्र एकदा घरी आल्यावर
जेव्हा ताथत्तय्या करत एकानंतर एक दोन्ही पाय खाजवू लागले तेव्हा 'अरे डास फार आलेत ,दरवाजा बंद केला नाही का',असं काहीबाही बोलून झालं.मग या प्रात्यक्षिकामुळे हा वात उतरला ,नेहमीचे लिक्विडेटर पुन्हा आले.बरं अट्टाहासापयी हे तयार करण्याचा उपद्व्याप ही स्वतः केला होता त्यांनी.
शेवटी असा निष्कर्ष निघाला की त्या तेलाचे वायूत रूपांतर होण्यासाठी योग्य असे तेल,तापमान हे मॅच होत नसावे.तो कडू वास ,त्याचा हाS पसारा या बाबी औरच!
अशाच गमतीजमती बाहेरही घडतातच.एकदा एक सहकारी हिंदी भाषिक मैत्रीण म्हणाली,'अरे वो पता है,हम ये आटा गुॅंथके रखते है ना फ्रीजमें,' आम्ही उत्सुकतेनं ऐकलं 'हां!' 'ये जो हम उसकी चपाती खाते है ना ,उसका सिध्धा असर ,ओवरी पे होता है! ' हां', परत माझे डोळे माठे झाले.
म्हणजे विज्ञान शिक्षिका असल्याने तोंडापासून ओटीपोटापर्यंत अशी रेषा तयार झाली.'सिध्धा असर' (म्हणजे बुरा असर)कसा होणार हे काही समजले नाही.एकूण ते पीठ वाईट बनू शकते! पण अतिशयोक्तीला मर्यादा नाही,या क्षेत्रात! अर्थात व्हाट्सअप गुरूची कमाल ही!
आॅरगॅनिक भाज्या,पावडर्ड आॅ.गूळ,पिंक साॅल्ट,सेंधानमक म्हणजे ज्यांच्या शेंदेलोण,सैंधव हे उपवासात होते ते रोजच्या जेवणात आले.कारण जे जे आरोग्यदायी ते ते व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतून समजत गेले.आणि हो हानिकारक काय ते ही.असेच एक औषध लाॅकडाऊनमध्ये
घरोघरी आले(वजन कमी करण्यासाठी) कडूजिरे,ओवा,मेथ्या भाजून,पूड करून खाणे.म्हणजे हे इतके इफेक्टिवपणे सांगितलेले असते की पाहणाऱ्याला माझ्या घरातल्यांनी ऐकलेच पाहिजे,असे वाटते.अगं हो गं! करून बघायला काय हरकत आहे,असे वाक्य तयारच असते !हा इंनोसन्स पाहिला की त्रास होतो.कधीकधी घरातले आपल्यालाही पकडतात! बघ,आता तू ही सांगतेसच की!साड्यांची नावे,दागिण्यांची नावे,चालू सणांचे ट्रेंडस् हे ज्ञान वाढतेच!हे खरे!
आमच्या स्कूलमेट्सचा एक व्हा.ग्रूप आहे.तिथे देशापरदेशातले डॉक्टरही आहेत.एका मित्राने,आपले की त्यांचे की 'ढकला पुढे'चे ज्ञान तपासण्यासाठी निरागसपणे हार्ट अटॅक आल्यानंतर काय करावे याचा खूप व्हायरल झालेला एक व्हिडिओ टाकून ,हे खरे आहे का? (म्हणजे उपाय होता तो!)
हे विचारले."हे असे काहीच नाही/नसते "असे ,उत्तर मिळाले.
कुठल्याही परिपूर्ण ज्ञानाच्या तुलनेत ही अर्धवट माहीती धोकादायकच असणार,हे बरोबरच!
त्यातल्यात्यात भोळ्या लोकांना ,पुढे कोण ज्ञान देतेय ,हे कुठे दिसते? त्यांच्या काय डिग्र्या असतात ,हे कुठे कळते?पण समोरून पहाणारा जेवढा सरळ ,तेवढा त्यात रमतो.खरे आहे की खोटे हे कळत नाही.नेटवरून गोळा केलेली माहिती पुन्हा नेटवर पसरवणे ,हे चालू असते.सिनेमा नटनट्या,राजकारणी यांच्याबद्दल अशीच खोटी माहीती पुढे जात असते.उत्सुकता जास्त असल्याने वाचली,पाहिली जाते.घडली रे घडली एखादी घटना की माहितीचा पाऊस चालू होतो.
बरं हे डोळ्यांना सुखावणारे तरी धोकादायकच आहे.मुख्यत: क्राफ्ट इत्यादीं कलांमध्ये,चुका,शिका,नव्या कल्पना उमलू द्या ,हे बंद झाले आहे,उघडा यु ट्यूब ,बनवा कलाकृती हे घातक आहे.चुकलेल्या कलाकृती , रेसिपीज सफाईदारपणे पूर्ण झालेल्या दाखवता येतात,चुका डिलीट करून.यामुळे सत्यात फजिती होते,हे खरे!मोठ्या मोठ्या लोकांच्या भाषणांमध्ये येणारे तेच ते विनोद ऐकले की ज्ञानाचा उगम काय असावा हे लगेच कळते.तसेच विद्यार्थ्यांचे गृहपाठ,निबंध स्पर्धांमधील निबंध तपासताना आता फक्त कुणाचे शुद्धलेखन बरे ,एवढेच तपासायचे राहिले आहे,बाकी सगळे एकसारखेच छापलेले असते,असेही होते.
बस्स! मेंदूचा ताबा घेणारी कुठलीही बाब तपासून घ्यायला हवी हे खरे!
अर्चना मुरुगकर

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा