पोस्ट्स

साहित्यातील राजकारण

इमेज
 साहित्यातील राजकारण साहित्य हे समाजाला दिशा देणारे आहे.साहित्यिकाचा आजही समाजात आदर केला जातो.तो त्याच्या एकमेवाद्वितीय प्रतिभेमुळे.थकलेल्या मनाला ते मार्गदर्शन करते .अनेक अभ्यासू व्यक्तींमुळे आपल्याला माहीत नसलेल्या क्षेत्रातील माहिती मिळते.अध्यात्मिक साहित्य हे मन: शांती प्रदान करते.लहानपणापासून एका निष्ठेने आपण या क्षेत्राकडे पहात असतो. हे सगळे असूनही साहित्यात होत असणारे राजकारण नजरेस पडते. पूर्वी कलाकारांना ,साहित्यिकांना राजाश्रय असायचा,निधीचा प्रश्न पडायचा नाही.आता स्वतंत्रपणे साहित्यसमूह मोठे करताना ते टिकवण्यासाठी न आवडणारी मदतही स्विकारावी लागते.ते आणून देणारे ,साहित्यात रस नसणारे पण लोक जपावे लागतात.निधीसोबत त्यांना हवे ते नाव,मत,प्रवाह,पक्ष ,पूर्वजांचे नाव मोठे होते.साहित्य दुय्यम ठरण्याचा धोका यात आहे. शिवाय माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जो तो ज्ञान पसरवत आहे,यात माझे ते खरे, सगळ्यांना माझा विचार समजलेच पाहिजेत , ते बिंबवलेच पाहिजे या अट्टाहासातून स्वत:च्या तथाकथित विचारसरणीची माणसे एकत्र येतात गट-तट पडत जातात.राजकारण होते. आपण स्वत: साहित्यिक म्हणून विकसित होताना काह...

हरकत नाही

इमेज
 *शुक्रवार दि. १८/७/२५* *साप्ताहिक गझलगंध उपक्रम क्र. २३८* *रसग्रहण* गझलकार मधुसुदन नानिवडेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. हरकत नाही- हा रदिफच विशेष आहे.बेफिकीर,मिश्किल वृत्ती दाखविणारा आहे.जेव्हा खोलवर दु:ख होते ,तेव्हादेखील दु:ख देणाऱ्या व्यक्तीला  हरकत नाही म्हणून माफ करणे हा खरा मोठेपणा,उदारपणा होय.शिवाय स्वत:ची समजूत घालत ,एक मार्ग संपला तर दुसरा शोधणे होय. भरतीहुनही तुझि ओहोटी भरास येते जगावेगळा तु़झा समिंदर हरकत नाही सामान्यत: भरती ही भरास येते ,तिचा भरभरून देण्याचा  कल असतो. प्रेमाला भरते येणे,भरभरून प्रेम करणे होय.परंतु एखाद्याला टाळायचेच असेल तर माणूस हजार कारणे देतो.ती भेट होऊच नये अशी त्याची ईच्छा असते.आपला हा नकार कैक रुपातून कट्टरपणे पाळतो.हे भांडण,प्रिय व्यक्तीचे जवळ नसणे म्हणजेच ओहोटी होय. किनाऱ्यापासून दूर दूर जाणाऱ्या लाटा हा वियोगच दाखवतात. यात शेरात विरोधाभासातून भरती आणि ओहोटी यातून दूर गेलेल्या नात्याचे वर्णन केले आहे.गझलकारानेओहोटीचीच भरती आली आहे ही कोटी केली आहे.जगावेगळा 'तुझा समिंदर ' म्हणून आश्चर्य व्यक्त केले आहे. या स्थितीचे वेगळेपण सांगितले आ...

राजस नखरा

इमेज
 राजस नखरा शांत ,शुभ्र,मोत्यासारखा टपोरा मोगरा, फुलतो तो फक्त दाहक उन्हाळ्यातच.काही ठिकाणी सरबतात वापरला जातो तर काही ठिकाणी सौंदर्य प्रसाधनात! चैत्र गौरीच्या हळदीकुंकवाची रंगत हिरव्यागार आंब्याच्या डहाळ्या,लगडलेल्या कैऱ्या,सुगंधी सरबत,हातावर दिले जाणारे अत्तर,गुलाबदाणीतील गुलाबपाणी,तिखटगोड आंबट चव व हिंगाची फोडणी असणारी आंबेडाळ,मंदगंधित कलिंगडाच्या फोडी,वाळा घातलेले माठातले थंडगार पाणी यासोबतच  गौरीच्या झोपाळ्यावर ,अंबाड्यावर असणारी मोगऱ्याची वेणी खास बहार आणते. सुवास आणि गारवा निर्माण करते.सुवासिणींना दिले जाणारे मागऱ्याचे गजरे ही तर मोलाची भेट वाटते. वसंत ऋतूमधला हा काळ सुगंधित करून जातो. चैत्र महिन्याचं स्वागत हा मोगरा करतो आणि तळपत्या उन्हात मिरवत राहतो. स्वतःचं शुभ्रपण जपतो. आतपर्यंत असणाऱ्या छोट्या पाकळ्या आणि पाकळीमागून वर येणाऱ्या पाकळ्या गूढता ,धुंदगंधितता वाढवतात. दोन पानांमध्ये लडिवाळपणे उमलणारा मोगरा मंदगंधाने जगाला थंडाव्याची साद देत असतो. मोगऱ्याची टपोरी फुलं उमलली की निसर्गाने अत्तराच्या कुप्या उघडल्या आहेत असेच वाटते! आपल्या प्रिय व्यक्तीने आवडीने दिलेली मो...

लावणी

इमेज
  #गोदातीर्थउपक्रम लावणी वृत्त - हरिभगिनी वाट पाहुनी जीव खंगला अधीर झाले मी राया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया कशी थांबवू तुम्हा विना मी या थरथरत्या कायेला तुमच्या डोळ्यामध्ये दिसल्या आतुरलेल्या  मायेला गडद गुलाबी नवी पैठणी खंत लागली सांगाया उगाच बाई इतकी सजले फुकाच जाइल हो वाया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया रुबाब तुमचा मनात ठसला तुम्हा पाहुनी गोंधळले नजर रोखुनी कशास बघता उरात माझ्या धडधडले पायामधले बघा लागले पुन्हा घुंगरू वाजाया तुम्हा करीता पुन्हा पटावर धावत आले नाचाया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया नकाच सांगू सबब कोणती लोकांची अन गावाची नजर सांगते तुमची एकच राणी मी हो मानाची पाउल तुमचे का अडखळले इथे लागले थांबाया लाख सोडुनी तुमच्यामध्ये जीव लागला गुंताया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया दंडामध्ये चोळी रुतली कथा सांगते ज्वानीची नाव विसरले गाव विसरले करणी झाली पिरतीची दूर थांबता उगाच बघता कसे लागता भुलवया हुरहुरलेली चंचल हरिणी तुम्हा लागली शोधाया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया. ©अर्चना मुरुगकर

नागपंचमी

इमेज
 नागपंचमी खरोखरच विहंगम असे श्रावणाचे चित्र!   हा सणांचा महिना! श्रावणी सोमवार, शुक्रवार यातून श्रावणाची गंमत सुरू होते.   बेल, आघाडा, केणा,दुर्वा, फुले गोळा करताना बारकाईने हिरवी सृष्टी बघायला मिळते. पूजा, मंगलमय आरती याने भारावून गेल्यासारखे वाटते.       नागपंचमी हा एक श्रावणातला सुंदर सण! या दिवशी नागाची पूजा करण्यासाठी वारुळाला म्हणजे नागोबाच्या मंदिरात बायका जातात. बांगड्या, नेलपेंट, रिबिनी,नवे कपडे याची गंमत असते.हातावर मेंदी लावली जाते. हिरवागार निसर्ग, लालबुंद रंगलेली मेंदी हा संगम आनंददायी वाटतो. एक बदल! यातून सौंदर्यदृष्टी विकसित होते. ज्वारीच्या  लाह्यांचा प्रसाद असतो. फोडणीच्या लाह्या, दही मेतकूट घातलेल्या लाह्या असे पदार्थ खायला मिळतात. ज्वारी हे कोंडायुक्त भरडधान्य त्याच्या भाजून बनवलेल्या लाह्या पचायला हलक्या असतात.   पंचमीदिवशी उकडीचे पदार्थ करतात. मुटके भात, पुरणाचे दिंड,ओल्या शेवयांची खीर हे या ऋतूमानात पचणारे ,हलके असे अन्न! वडिलांचे,भावांचे डोळे धुवून औक्षण केले जाते. डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्वाचे आहे....

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

इमेज
  धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय * धबधब्यावरील अपघातांच्या घटना या मनाचा थरकाप उडवणाऱ्या असतात.टी.व्ही वर नातेवाईकांचा दाखवला जाणारा विलाप सहवेदना निर्माण अरणारा असतो. का? का? का गेले असतील हे? हा एक क्षण टळला असता तर? कशाने तरी ती छोटी मुले वाचली असती तर? हे पुन्हा , पुन्हा मनात येते. अनेक ठिकाणी या घटना नेहमीच होत असतात.रात्री उशिरापर्यंत, पावसापाण्यात जखमींना किंवा पार्थिव शरीरांना शोधणाऱ्यांचीच काळजी वाटते. एवढा निसर्ग त्यावेळी अनियंत्रित झालेला असतो.लोणावळ्यातील घटना, मागच्या वर्षी हरिश्चंद्र गडावरील पावसात अडकलेली मुले,त्यात गेलेला एक छोटा मुलगा.गड चढताना होणारे अपघात ,हे सगळे आठवत असते.मध्यंतरी एक रीलस्टार मुलगी गेली.  या सगळ्यामागे वेगवेगळ्या मानसिकता आहेत. तरी आनंद मिळवणे हा एक समान हेतू आहे. ऋतूबदल हा मनाला सुखावणारा असतो. निसर्गाचे विलोभनीय  दृश्यही सगळ्यांनाच भावते. माणूस रोजचे रहाटगाडगे ओढत असताना अनेक आनंदांना मुकतो. अचानक कुठे तरी हे वेगळेपण पाहून उत्सुकता, आवड वाढत जाते. त्यात तो गुंतत जातो.  आनंदाच्या कल्पना आता बदलत आहेत. तरूण - तरूणी बाहेर शिक्ष...

गणेश चारोळी

इमेज
 

पर्यटन

इमेज
  पर्यटन- भ्रमंतीचे  महत्व पर्यटन ही एक अनुभूती आहे. नेहमीच्या त्याच त्या कामातून माणूस बाहेर पडतो. त्याला हा बदल सुखावणाराच असतो.थंडगार मोकळी हवा, निसर्गाचे सन्निध्य आणि कुठलेच वेळेचे बंधन नसणे यासारखे सुख नाही. रोम रोम आनंदाने पुलकित होतो. यातून भिन्न संस्कृती समजते. वेगवेगळ्या ठिकाणचे आहार विहार, आचार, पोषाख यांची माहिती मिळते. खाद्यपदार्थांवरही ताव मारता येतो. बरं आजच्या काळात सारे कुटुंब एकमेकांना पूर्ण वेळ देऊ शकते. अनेक सफरी संस्मरणीयही ठरतात.   पर्यटनामुळे अनेक ऐतिहासिक ठिकाणे प्रत्यक्ष पहाता येतात, भौगोलिक वैविध्य समजते, जैविक वैविध्य, वेगळी झाडे, माती, डोंगर, कधी बर्फ तर कधी समुद्र अनुभवता येतो. अनुभवणे हे व्ययक्तिक पातळीवरचे असते.माणसाला ताणतणावांचा विसर पडतो. पुन्हा कार्य करण्याची उर्मी मिळते. संघामुळे  आनंद वाढतो.   माणसाचे आपल्या घरावर प्रेम असते. घर सुटतच नाही. या प्रवासाच्या धामधुमीत सर्व कष्टदायक जबाबदाऱ्यांतुनही आपसूकच मुक्तता होते. आपल्यामुळे जगात काही फरक पडत नाही, हे तरी कळतेच. उत्साहाने जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती वाढते. तीच ती रूढी ब...

लेख मकरसंक्रांत

  *मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*      आपले सगळेच सण उत्सव हे निसर्ग, शेतीप्रधान जीवनपद्धती, मौसमी फळे -भाज्या यांच्याशी निगडीत आहेत. पौष महिन्यात रथसप्तमीपर्यंत  होणारी आदित्य राणूबाईची पूजा, दर रविवारी केली जायची. त्याच्या कथा ऐकल्या जात असत.  त्यातून मिळणारा संदेश उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.. हे कानात घुमत असते. या रविवारची,रथसप्तमी ची पूजा, रांगोळीने चंदनाच्या पाटावर सूर्य, रथ रेखाटणे अशी होत असे. यातून प्रिंट मिडिया खूप प्रगत नसताना भौगोलिक ज्ञान,जीवन यांची सांगड  संस्कृतीच्या माध्यमातून  पुढच्या पिढ्यांकडे गेली.  बिब्याची फुले, करडईचे फुले यांना महत्व असायचे. बिब्याची फुले वातहारक आहेत. प्रत्येक देवतांच्या आवडत्या फुलांमध्ये काही वैशिष्ट्ये दडली आहेत. पिवळे, तपकिरी असे हे करडई फूल सूर्याच्या तेजस्वी पणाचे द्योतक आहे.  भोगविडे,संक्रांत, कर आणि महिनाभर चालणारे हळदीकुंकू असे उत्सवी बायकांच्या गोटातले वातावरण  संक्रांती निमित्ताने चालू असायचे. भोगीला सात विड्याची पाने, सात...

श्रावण

 श्रावण श्रावण म्हणजे सळसळणारी हिरवी पाने ओली गं झोपाळ्यावर झुलता झुलता मने सयांची  भिजती गं खरोखरच विहंगम असे श्रावणाचे चित्र! आताच्या धावपळीत केलेली एखादी वर्षासहल निसर्गाच्या बरेच जवळ घेऊन जाते.  पण कुठे तरी अपुर्णता  जाणवते. बालपणीचा श्रावण डोळ्यासमोर तरळत असतो. खेळता- खेळता,शाळेतून येतानाचे मुक्त भिजणे आठवते!  हा सणांचा महिना! श्रावणी सोमवार, शुक्रवार यातून श्रावणाची जाणीव व्हायची.   श्रावणी सोमवारची अर्धी सुट्टी, बेलाचे ढीग, पांढरी फुले, मंदिराजवळची गाणी, सगळे शिवमय होऊन जायचे.  श्रावणी शुक्रवारसाठी आघाडा, केणा,दुर्वा, फुले गोळा करताना बारकाईने हिरवी सृष्टी बघायला मिळायची. जिवतीची पूजा, पुरणाचा नैवेद्य, लक्ष्मीच्या आरत्या हे सगळे मंगलमय वाटायचे. जेष्ठादेवीच्या आरतीचे पुरणाचे दिवे असायचे. तूप टाकलेल्या या दिव्यांनी मुलांना ओवाळले जायचे, नंतर करपलेला भाग काढून ते दिवे खाणे ही गम्मतच असायची. या दिवशी श्रद्धेने  कथा वाचल्या जायच्या.       नागपंचमीही अशीच छान नटलेली. नागाची पूजा, त्यासाठी  वारुळाला म्हणजे नागोबाच्या ...

बाप

 सुमंदारमाला (लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा)  बाप मुलांनी शिकावे शहाणे बनावे अशी भावना रोज त्याच्या मनी सदा राबतो बाप प्रेमामुळे या असे कष्टणे रोज दारीघरी स्वत:ला उपाशी जरी ठेवतो तो जरा देतसे आवडीचे घरी असे एक इच्छा मनाशी तयाच्या मुलाने चढावे यशाच्या शिरी जरी शिस्त वाटे नकोशी नकोशी दरारा पित्याचा पहावा घरी  सहारा तिचा बाप रागावताना मऊ सावली माय वाटे बरी उबेचा दुशाला घरी गुंतलेला असे गोकुळाची जशी सावली मुलाला मिळे आत्मविश्वास येथे उडी झोपडीची निघे अंबरी असे काय नाते मुलाचे पित्याशी असा प्रश्न वेडा मला त्रासतो घडावे कशाने जगी युद्ध मोठे बनावे महाभारताचे जसे मुलाच्या सुखाची मनी लालसा ही स्वत: त्रासतो वंचनानी जरी जगी पितृ प्रेमामुळे या कुणाचे असे होतसे कधीचे हसे खरी ओढ पेशीतुनी या जिवाची नवे नाव नात्यास तो ठेवतो स्वत:च्या रुपाला जगी पाहतो तो नवे स्वप्न त्याचेच साकारतो फुटे अंकुराला कळी पालवी जी नवा वृक्ष होण्यास जोपासतो असे कौतुकाची अनोखी अदा ही स्वत:तील बापास जोपासतो सौ.अर्चना मुरूगकर

प्रदूषण

 *प्रदूषण टाळा अन्यथा विनाश अटळ* नमस्कार..  पर्यावरण म्हणजे जिवाच्या आजूबाजूचा परिसर! याचा जिवावर परिणाम होतो तसाच जिवाचाही पर्यावरणावर परिणाम होतो. अरण्यात राहणारा माणूस ते आजचा माणूस यात खूप फरक झाला आहे. तसाच पर्यावरणातही फरक झाला.  निसर्गाशी संलग्न असे जीवन जगणारा माणूस ते निसर्गाचा फक्त उपभोग घेणारा माणूस असा बदल प्रकर्षाने जाणवत आहे.  तापमान बदल, मातीची झीज, ग्रीन हाऊस इफेक्ट, हवा प्रदूषण, पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण, रासायनिक खतांचा वापर, हायब्रीड बियाणे, बायोटेक्नॉलॉजीचा फायद्यासाठी वापर ही सगळी पर्यावरण -हासाची उदाहरणे.  याचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. निसर्गातील संपूर्ण सजीव, निर्जीव घटकांवर याचा परिणाम होत आहे.आपली निसर्गपुजकाची संस्कृती! निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कितीतरी सण आपण साजरे करतो. नदीला आई म्हणतो. देवी म्हणून पूजा करतो. पण हळूहळू ही प्रथा शिल्लक राहिली आणि त्यामागची पर्यावरण रक्षणाची भावना कमी झाली.  आजच्या आपल्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मूर्मू यांनी आदिवासी समाजाची ओळख करून देताना 'आम्ही निसर्गात राहणारे आणि...

स्त्री आणि स्वयंपाकघर

 *रविवार लेख उपक्रम* दि.२/४/२०२३ *अजूनही स्वयंपाक या प्रकारात स्त्रियांची मक्तेदारी आहे का?*       खरे तर हा प्रश्नच अवास्तव आहे. आज  स्त्रिया माझी ही मक्तेदारी आहे, कुणीही हस्तक्षेप करू नका असे सांगतच नाहिएत! ही फक्त स्त्रियांची जबाबदारी आहे का? हा प्रश्न योग्य वाटतो.असे अनेकांना वाटते. ज्यांच्या अंगवळणी घर पडले आहे त्या आई, आजी, सासू, नणंद, जाऊ इत्यादी सर्वांना.सून सोडून.  पुरुषांनाही ही जबाबदारी फक्त स्त्रियांची आहे असे वाटू शकते, जेव्हा आयते हातात घेण्याची सवय लागलेली, लावलेली असते.  खरे तर मुलांचे संगोपन, घरात सुरक्षित रहाणे यासोबतच हे आलेअसावे. युद्ध, शेतीतली कठीण कामे किंवा अध्ययन यापासून स्त्रिया दूर होत्या, नजीकच्या भूतकाळात.  खरे तर स्वयंपाक हे पण शास्त्रच आहे. तो पण आपल्या माणसांसाठी प्रेमाने रांधावा लागतो. त्यात येणारे अनेक बारकावे, घरातल्यांच्या आवडीनिवडी जपाव्या लागतात. यासाठी निवांत वेळ, सराव, कौशल्ये, सहजता असे टप्पे येत जातात.  राहिला प्रश्न स्त्री - पुरुष आणि स्वयंपाक असा!  आता मुलींचे जीवन मुलांइतकेच नोकरीसाठी, कामधंद्...

गझलची ओळख आणि सुरेश भट

 गझल काय आहे हे माहीत नव्हते. पण  एकदा १७-१८ वर्षाची असताना वाचनाच्या सवयीमुळे मिर्झा गालिब यांचे चरित्र असणारे पुस्तक वाचण्यात आले होते.  या सुरेश भटांच्याच रचना आहेत, हे माहीत नसताना आशाजींनी गायलेली त्यांची अनेक गाणी खूप आवडायची. एकूणच पद्य लेखन करताना गझलेची फार लवकर ओळख झाली. गझल लेखन वाचन दोहोंचाही आनंद खूप वाटतो. मा. सुरेश भटांच्या गझलांची  गोडी अवीट आहे. ते या क्षेत्रातील अढळ स्थान आहे.  त्यांच्या जीवनावर आधारित पूर्वी केलेली एक रचना पुढे देत आहे.काही कमतरता असू शकतात. पण आदरभाव खरा आहे.  आपण या गझलपंढरीचे एक वारकरी, एक कण म्हणून भाग्यशाली आहोत ही भावनाही त्यांच्या प्रती जवळचे नाते दृढ करत असते.  या निमित्ताने मा. विजय जोशी सरांचे ही ऋण व्यक्त करते. 'जे जे ठावे आपणासी.. ' या उक्तीप्रमाणे ते गझल कार्यशाळा घेत असतात , मार्गदर्शन करतात आणि शिष्यही घडवतात.  एका विशाल सागराला काही ओळींमध्ये मांडण्याचा हा अल्पमती प्रयत्न. धन्यवाद!  मन दु:खात रंगले बहुधा सुख त्यालाच मानले बहुधा नशिबाशीच रोजचे लढणे क्षण शब्दात सांडले बहुधा जगण्यानेच मानता परक...

*मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*

इमेज
 *रविवार लेख उपक्रम* दि.१५/१/२०२३ *मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन* *मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*      आपले सगळेच सण उत्सव हे निसर्ग, शेतीप्रधान जीवनपद्धती, मौसमी फळे -भाज्या यांच्याशी निगडीत आहेत. पौष महिन्यात रथसप्तमीपर्यंत  होणारी आदित्य राणूबाईची पूजा, दर रविवारी केली जायची. त्याच्या कथा ऐकल्या जात असत.  त्यातून मिळणारा संदेश उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.. हे कानात घुमत असते. या रविवारची,रथसप्तमी ची पूजा, रांगोळीने चंदनाच्या पाटावर सूर्य, रथ रेखाटणे अशी होत असे. यातून प्रिंट मिडिया खूप प्रगत नसताना भौगोलिक ज्ञान,जीवन यांची सांगड  संस्कृतीच्या माध्यमातून  पुढच्या पिढ्यांकडे गेली.  बिब्याची फुले, करडईचे फुले यांना महत्व असायचे. बिब्याची फुले वातहारक आहेत. प्रत्येक देवतांच्या आवडत्या फुलांमध्ये काही वैशिष्ट्ये दडली आहेत. पिवळे, तपकिरी असे हे करडई फूल सूर्याच्या तेजस्वी पणाचे द्योतक आहे.  भोगविडे,संक्रांत, कर आणि महिनाभर चालणारे हळदीकुंकू असे उत्सवी बायकांच्या गोटातल...

गझल रसग्रहण (निखारा)

 निखारा """"'""""" *शांतपणे मी अवघड जगणे जगत राहिलो* *सुखस्वप्नांच्या भासावरती झुलत राहिलो* आजचे जगणे अवघड आहे तरी मी ते तक्रार न करता जगत आहे. त्या दु:खात असूनही सुखाचे भास मला होत राहिले. येणाऱ्या सुखाच्या आशेवर मी जगत राहिलो.  *अवती भवती जमले सारे सगेसोयरे* *स्वार्थ साधून निघून गेले कुढत राहिलो* सगेसोयरे फायद्यासाठी जवळ आले होते. त्यांचे काम झाले की निघून गेले आणि मी मात्र त्यांच्या आठवणीने आणि असा संधीसाधू पणा पाहून मनातच पुन्हा पुन्हा दु:ख करीत राहिलो.  *किती उन्हाळे जाळत गेले माहित नाही* *धोकादायक वळणावरती वळत राहिलो* नेहमी येणाऱ्या वंचनांमुळे गझलकाराचे मन दु:खी आहे. संकटामुळे होरपळले आहे. तरीही धोका पत्करुन, आव्हाने स्विकारुन जीवनात पुढे जाणे चालू आहे.  *जिकडे तिकडे रानभुलीच्या वाटा होत्या* *कुठे निवारा सापडतो का बघत राहिलो* जो मार्ग चोखाळावा तो भूल घालणारा फसवा निघत आहे. यामुळे जिवाला कोणताच दिलासा आधार राहिलेला नाही.  अशाही स्थितीत जिद्द न सोडता निवारा, आपल्या हक्काची विसाव्या ची जागा माणूस शोधत असतो.  *किती लांबचा प्रवास झाला क...

गझलगंध

इमेज
  🔹 *गझल* 🔹 सुगंधाच्या  तराजूने फुलांना तोलतो आता* *हवा ही बोलकी झाली हवेशी बोलतो आता फुलांचा आकार, रूप न पाहता तुलना करताना गझलकार सुगंध ही बाब लक्षात घेणार आहेत. जो आपोआपच हवे सोबत येतो. जो  अदृश्य आहे, जाणवणारा आहे. अर्क आहे, बेधुंद करणारा आहे त्याची खरी ओळख दाखविणारा आहे. एक हळूवार कल्पना आहे.  माणसाची कार्यकिर्ती अशीच असते. त्याची ओळख असते. ती किर्ती हवे प्रमाणे पसरणारी असते. ही जाणून घेण्याचे प्रयत्न गझलकार करत आहेत.  * हा एकदा जेव्हा दिला आधार शब्दांनी* *बघा आकाश ताऱ्यांचे कसे मी तोलतो आता* शब्द शक्ती, शब्द ताकद, शब्द आधार आहेत. त्यामुळे कोणत्याही मोठ्या पदा शिवाय खूप मोठा अभिव्यक्तीचा अधिकार प्राप्त झाला आहे.  आकाश हे व्यापक, विशाल आहे. तारे या जणू विविध कल्पना आहेत. शब्दांमुळे कवी लीलया असा  हा भार पेलत आहे.  * जयांना स्पर्शण्या भीती सदा वाटेल डोळ्यांना* *अशा अस्पृश्य अश्रूंची तिजोरी खोलतो आता* जी अनेक दडवलेली दु:खे आहेत, ती सहजतेने कवी काव्याच्या माध्यमातून व्यक्त करू शकतात.  एकाचा उल्लेख करणे देखील दु:खदायक आहे. पण या माध्यमातून...

अलक

  *२५/५/२२* *अलक लेखन* *विषय: वाढदिवस* घरात वाढदिवस म्हणजे धामधूम असायची. ताईचा वाढदिवस असला की तिचे अगदी कौतुक असायचे. भाऊच्या वाढदिसालाही मित्र, मैत्रिणी,  ग्रीटींग्स, हट्ट पुरवणे, सारे व्हायचे    बाबा गेले, पुजेसाठी फोटो बनवताना, त्यावर जन्म, मृत्यूच्या तारखा टाकल्या जात होत्या. अचानक लक्षात आले की सगळ्यांचे सारे करताना त्यांचा वाढदिवस मात्र कधी साजरा झालाच नव्हता.  सौ. अर्चना मुरूगकर त. दा.

रसग्रहण ०६/०५/२२

 🤗 _*हझल क्रमांक - २*_ 🤗 *चहूकडे चांडाळ-चौकड्या*  *कशास घालू मधे तंगड्या*  चांडाळचौकडी ही नको त्या गप्पा करण्यासाठी जमलेली असते. त्यांच्या या भानगडींची फलनिष्पत्ती ही निरर्थक असणार आहे. अजून हा गुंता वाढविण्यासाठी मी कशाला सामील होऊ?  रिकाम्या चांडाळचौकड्यांमधील असेच लोक सर्वत्र दिसत आहेत. मी  तंंगड्या घालणे, विनाकारण सामील होणे तमाशा (😁)घडवून आणण्या सारखेच आहे.  *कुठला कंपू, कुठला अड्डा!*  *उगाच उठवू नका वावड्या*  दुसऱ्यांकडे बघून विनाकारण मत बनवणे घाई करण्यासारखे आहे. फक्त ही तुमची भीती असू शकते!  हे अस्तित्वातच नाही ना!  *कशास देता कान भिंतिला*  *खिडक्या माझ्या सताड उघड्या*  माझ्याबद्द्ल बातम्या काढायचा प्रयत्न करू नका. मी सगळे माझे जीवन उघडे, सगळ्याला कळेल असे ठेवले आहे. एवढेपण कष्ट घेऊ नका हो!  *अख्खे जग हे फिदा तुझ्यावर!*  *किती कल्पना तुझ्या भाबड्या*  माणसाला आपण लोकांना फार आवडतो, ते मागे लागले आहेत, असे वाटते.  हे! हे! किती भोळेपणा आहे हा! कोणी तुझ्या मागे लागले नाही.  *टिपूस नाही डोळ्यांमध्...

राम

इमेज
  राम मनातील जागा होतो मनुष्य साधा कश्चित् किंचित चुकतो शिकतो नवीन घडतो विवेक संयम पाळत जाता राम मनातील जागा होतो दुर्मती रावण वाढत आहे जागोजागी आडवा येतो संस्कारांची जाणिव होता राम मनातील जागा होतो कुंभकर्ण निद्रिस्त कधीचा शासक येथे झोपी जातो सत्य नितीचा विजय पाहुनी राम मनातील जागा होतो वाटा येथे खारीचाही बीभीषणही साथी होतो धेय्य एक जर सत्शील सुंदर राम मनातील जागा होतो दुष्टांचे निर्दालन करण्या आदर्शांची स्वप्ने बघतो भजता भजता रामाला मग राम मनातील जागा होतो सौ. अर्चना मुरूगकर